
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
Arun Govil Ramayana : रामायण’ म्हटलं की आजही अनेक प्रेक्षकांच्या डोळ्यांसमोर अरुण गोविल यांचा प्रभू रामाच्या भूमिकेतील चेहरा उभा राहतो. एका पिढीने त्यांच्या अभिनयातून प्रभू रामांना पाहिलं आणि त्यांची ही भूमिका भारतीय प्रेक्षकांच्या मनात कायमची अजरामर झाली. आता अरुण गोविल पुन्हा एकदा ‘रामायण’च्या विश्वात परतले आहेत; मात्र यावेळी ते प्रभू राम नव्हे, तर अयोध्येचे राजा आणि प्रभू रामांचे पिता दशरथ यांची भूमिका साकारताना दिसणार आहेत.
नमित मल्होत्रा यांच्या ‘रामायण’च्या निर्मात्यांनी अरुण गोविल यांचे राजा दशरथच्या भूमिकेतील खास सोलो पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित केलं आहे. या पोस्टरमध्ये अरुण गोविल राजेशाही अवतारात दिसत असून, त्यांच्या लूकमधून अयोध्येच्या राजाची भव्यता, प्रतिष्ठा आणि अधिकार अधोरेखित होत आहे.
प्रभू रामांच्या भूमिकेसाठी संपूर्ण देशभरात प्रसिद्ध असलेल्या अरुण गोविल यांना आता त्याच रामाचे पिता असलेल्या राजा दशरथांच्या भूमिकेत पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. त्यामुळे त्यांचा हा नवा लूक विशेष चर्चेत आला आहे.
‘एका पिढीसाठी त्यांनी रामाला जिवंत केलं…’
अरुण गोविल यांचं ‘रामायण’शी असलेलं खास नातं अधोरेखित करत निर्मात्यांनी पोस्टर शेअर करत लिहिलं, “एका पिढीसाठी त्यांनी रामाला जिवंत केले. आता ते ‘रामायण’च्या विश्वात अयोध्येचा राजा म्हणून परतले आहेत. राजा दशरथच्या भूमिकेत अरुण गोविल.”
अरुण गोविल यांनी साकारलेला प्रभू राम आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. त्यामुळे आता त्यांना दशरथांच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’मध्ये रणबीर कपूर प्रभू रामांच्या भूमिकेत दिसणार आहेत. साई पल्लवी सीतेची भूमिका साकारत असून, रॉकिंग स्टार यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर सनी देओल हनुमान आणि रवी दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार ‘रामायण’
नमित मल्होत्रा यांच्या प्राइम फोकस स्टुडिओजच्या निर्मितीखाली, DNEG आणि यश यांच्या मॉन्स्टर माइंड क्रिएशन्सच्या सहकार्याने ‘रामायण’ची निर्मिती होत आहे. हा दोन भागांमध्ये प्रदर्शित होणारा भव्य महाकाव्यात्मक चित्रपट आहे.
चित्रपटाचा पहिला भाग ५ नोव्हेंबर २०२६ रोजी जगभरात प्रदर्शित होणार असून, दुसरा भाग दिवाळी २०२७ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भारतात हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
‘रामायण’ IMAXमध्येही प्रदर्शित केला जाणार आहे. भारताबाहेरील वितरणाची जबाबदारी सोनी पिक्चर्सकडे असून, हिंदी भाषिक बाजारपेठेसाठी धर्मा प्रॉडक्शन्स वितरक म्हणून काम करणार आहे.