
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Bigg Boss 20: सलमान खानचा लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस २०’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. या शोच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ६ सप्टेंबर २०२६ रोजी सुरू झालेल्या या सीझनमध्ये पहिल्या दिवसापासूनच हाय-व्होल्टेज ड्रामा, जोरदार वादविवाद आणि अनेक अनपेक्षित घडामोडी पाहायला मिळत आहेत. साधारणपणे बिग बॉसचा सीझन डिसेंबरच्या अखेरीस किंवा नवीन वर्षाच्या सुरुवातीला संपतो. मात्र, यंदा या सीझनच्या प्रदर्शनाचा कालावधी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘बिग बॉस २०‘ला प्रेक्षकांकडून मिळणारा चांगला प्रतिसाद पाहता निर्माते या सीझनला दोन ते चार आठवड्यांची मुदतवाढ देण्याचा विचार करत असल्याची चर्चा आहे. सुरुवातीला हा सीझन अंदाजे १५ आठवडे चालणार असल्याचे सांगितले जात होते. त्यानुसार २० डिसेंबर २०२६ रोजी या शोचा ग्रँड फिनाले होण्याची शक्यता होती. मात्र, आता शोचा कालावधी वाढल्यास ग्रँड फिनालेची तारीखही पुढे जाऊ शकते.
‘या’ तारखेला होणार मुदतवाढीबाबत अंतिम निर्णय?
‘बिग बॉस २०’ सध्या ११ व्या आठवड्यात पोहोचला आहे. शोला मुदतवाढ मिळणार असल्याच्या चर्चा सुरू असल्या, तरी चॅनल किंवा निर्मात्यांकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. २० नोव्हेंबर २०२६ रोजी या प्रस्तावावर अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर मुदतवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली, तर हा सीझन जानेवारी २०२७ पर्यंत सुरू राहू शकतो. त्यामुळे प्रेक्षकांना ‘वीकेंड का वार’चे आणखी काही धमाकेदार भाग पाहायला मिळू शकतात.
विक्रमी व्ह्यूअरशिप ठरतेय मुदतवाढीमागचे कारण?
या सीझनला मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद हे मुदतवाढीच्या चर्चेमागचे एक महत्त्वाचे कारण मानले जात आहे. जिओहॉटस्टारवरील या सीझनने ६० दिवसांपेक्षा कमी कालावधीत एक अब्ज तासांहून अधिक व्ह्यूअर टाइम मिळवला आहे. याशिवाय शोला ३.५ अब्जांहून अधिक मते मिळाल्याचा दावा केला जात आहे. या आकडेवारीमुळे ‘बिग बॉस’च्या इतिहासातील वेगवान विक्रमांमध्ये या सीझनची नोंद झाल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, शोला मुदतवाढ देण्याच्या मार्गातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खुद्द सलमान खानचे व्यस्त वेळापत्रक. शो वाढवल्यास त्याला ‘वीकेंड का वार’च्या अतिरिक्त भागांच्या चित्रीकरणासाठी वेळ काढावा लागणार आहे. सध्या सलमान खान त्याच्या आगामी ‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तयारीत व्यस्त आहे. हा चित्रपट ४ डिसेंबर २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. याशिवाय दिग्दर्शक वामशी पैडीपल्ली यांच्या ‘मॉन्स्टर’ चित्रपटाचे चित्रीकरणही त्याच्या आगामी कामांमध्ये आहे.
त्यामुळे ‘बिग बॉस २०’ला मुदतवाढ मिळणार की नाही, हे सलमान खानच्या उपलब्ध तारखांवरही अवलंबून असेल. आता निर्माते याबाबत काय निर्णय घेतात आणि प्रेक्षकांना या सीझनचा खेळ जानेवारी २०२७ पर्यंत पाहायला मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.