
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Manoj Bajpayee: बॉलिवूड अभिनेता मनोज बाजपेयी लवकरच एका वेगळ्या आणि महत्त्वपूर्ण भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. दिग्दर्शक सुधीर मिश्रा आणि निर्माते अनुभव सिन्हा यांच्या आगामी चित्रपटात ते महात्मा गांधी यांची भूमिका साकारणार आहेत. विशेष म्हणजे, या चित्रपटाचे चित्रीकरण आता अधिकृतपणे पूर्ण झाले असून, निर्मात्यांनी हा महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. दरम्यान, गांधीजींच्या भूमिकेतील मनोज बाजपेयी यांचा एक फोटो ऑनलाइन लीक झाला असून, त्यांचा हा लूक पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
अनुभव सिन्हा यांच्या बनारस मीडिया वर्क्स या निर्मिती संस्थेच्या बॅनरखाली तयार होणारा हा चित्रपट भारतीय इतिहासातील फारशा परिचित नसलेल्या २१ दिवसांची कथा मांडणार आहे. भारताच्या स्वातंत्र्यापूर्वीच्या काळातील या महत्त्वपूर्ण घटनांवर चित्रपटातून प्रकाश टाकण्यात येणार आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच त्याच्या वेगळ्या विषयामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती.
महात्मा गांधींच्या भूमिकेत मनोज बाजपेयी
या चित्रपटाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे मनोज बाजपेयी यांची महात्मा गांधींची भूमिका. राष्ट्रीय पुरस्कार विजेते मनोज बाजपेयी पहिल्यांदाच पडद्यावर बापूंची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहेत. प्रत्येक भूमिकेत स्वतःला पूर्णपणे झोकून देण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या मनोज यांनी या भूमिकेसाठी विशेष मेहनत घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यांचा गांधीजींच्या लूकमधील फोटो ऑनलाइन लीक झाल्यानंतर या भूमिकेबद्दलची चर्चा आणखी वाढली आहे.
वहीदा रहमान यांच्याही महत्त्वपूर्ण सहभागामुळे चित्रपटाची उत्सुकता वाढली
या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेत्री वहीदा रहमान यांचाही सहभाग आहे. त्यांच्यासोबत मनोज बाजपेयी आणि सौरभ शुक्ला यांसारखे अनुभवी कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसणार आहेत. वहीदा रहमान यांची चित्रपटातील उपस्थिती या प्रोजेक्टला विशेष महत्त्व प्राप्त करून देते.
या चित्रपटाचे दिग्दर्शन सुधीर मिश्रा यांनी केले असून, अनुभव सिन्हा यांनी बनारस मीडिया वर्क्सच्या बॅनरखाली निर्मिती केली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील अनोखा विषय, ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि दिग्गज कलाकारांची फळी यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांसाठी खास ठरण्याची शक्यता आहे. चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर आता चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत आणि पुढील अपडेट्सबाबत प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.