(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Dheeraj Dhoopar-Vinny Arora: टीव्ही अभिनेता धीरज धूपर आणि अभिनेत्री विन्नी अरोरा यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. या जोडप्याने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर करत लग्नाच्या दहाव्या वाढदिवसाचा आनंद साजरा केला आहे. मात्र, या फोटोंमधून त्यांनी चाहत्यांना आणखी एक सरप्राईज दिलं आहे. फॅमिली फोटोशूटमधील एका खास कार्डमधून धीरज आणि विन्नी यांनी पुन्हा एकदा आई-बाबा होणार असल्याचे संकेत दिले आहेत. ही पोस्ट पाहून चाहत्यांसह सेलिब्रिटी मित्रांनीही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
धीरज धूपर आणि विन्नी अरोरा यांनी २०१६ मध्ये लग्नगाठ बांधली होती. १६ नोव्हेंबर रोजी या जोडप्याने त्यांच्या लग्नाचा दहावा वाढदिवस साजरा केला. या खास दिवसानिमित्त दोघांनी एक सुंदर फॅमिली फोटोशूट केले. यामध्ये ते मुलगा झैनसोबत आनंदाचे क्षण घालवताना दिसत आहेत.
हे फोटो शेअर करताना धीरज आणि विन्नी यांनी खास कॅप्शनही लिहिले. “एक दशक एकत्र, आणि पुढे आयुष्यभर. दहा वर्षांनंतरही, तू माझी सर्वात आवडती व्यक्ती आणि माझी सर्वात आवडती प्रेमकथा आहेस. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, माय लव,” अशा शब्दांत त्यांनी एकमेकांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
फोटोशूटमधील खास कार्डने वेधलं चाहत्यांचं लक्ष
धीरज आणि विन्नी यांनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये दोघेही पांढऱ्या रंगाच्या पोशाखात दिसत आहेत. सुरुवातीच्या फोटोंमध्ये त्यांची रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळते. तर काही फोटोंमध्ये ते मुलगा झैनसोबत आनंदाने वेळ घालवताना दिसतात. धीरज आणि विन्नी आपल्या लेकाकडे प्रेमाने पाहताना दिसत आहेत.
मात्र, या फोटोशूटच्या शेवटी शेअर केलेल्या एका कार्डने चाहत्यांचे विशेष लक्ष वेधून घेतले. या कार्डवर, “आम्ही आमच्या कुटुंबात आणखी थोडे प्रेम जोडत आहोत,” असे लिहिले आहे. त्यामुळे धीरज आणि विन्नी दुसऱ्यांदा आई-बाबा होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. चार वर्षांपूर्वी या जोडप्याने मुलगा झैनचे स्वागत केले होते. आता त्यांच्या कुटुंबात आणखी एका नव्या पाहुण्याचे आगमन होण्याची शक्यता आहे.
धीरज आणि विन्नी यांनी ही पोस्ट शेअर करताच त्यांच्या चाहत्यांनी आणि मनोरंजनविश्वातील मित्रांनी कमेंट्समधून आनंद व्यक्त केला. लग्नाच्या दहा वर्षांच्या सहजीवनानंतर त्यांच्या कुटुंबात आणखी एका सदस्याची भर पडणार असल्याच्या बातमीने चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.






