
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
B.P. Singh Passes Away: लोकप्रिय टीव्ही मालिका ‘सीआयडी’चे निर्माते आणि दिग्दर्शक बी. पी. सिंह यांचं निधन झालं आहे. २७ ऑक्टोबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ७७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या निधनामुळे मनोरंजनविश्वात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २८ ऑक्टोबर रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
बी. पी. सिंह यांनी आपल्या दिग्दर्शन आणि निर्मितीच्या माध्यमातून ‘सीआयडी’ या मालिकेला लोकप्रियतेच्या शिखरावर नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. १९९८ मध्ये सोनी वाहिनीवर सुरू झालेली ही मालिका २०१८ पर्यंत प्रेक्षकांचं मनोरंजन करत होती. तब्बल दोन दशकं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या मालिकेची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्येही झाली होती.
गुन्ह्यांची उकल, रहस्य आणि तपासाची अनोखी शैली यांमुळे ‘सीआयडी’ने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं. मालिकेतील पात्रं आणि त्यांचे संवाद आजही अनेकांच्या स्मरणात आहेत. भारतीय टेलिव्हिजनवरील दीर्घकाळ चाललेल्या लोकप्रिय मालिकांमध्ये ‘सीआयडी’चं नाव आवर्जून घेतलं जातं.
दिग्दर्शनासोबत अभिनयाचीही छाप
बी. पी. सिंह हे केवळ निर्माते आणि दिग्दर्शक नव्हते, तर त्यांनी ‘सीआयडी’मध्ये अभिनयही केला होता. या मालिकेत त्यांनी डीसीपी शमशेर सिंग चित्रोले ही काहीशी वेगळी आणि तऱ्हेवाईक पोलिस अधिकाऱ्याची व्यक्तिरेखा साकारली होती. त्यांच्या या भूमिकेमुळे मालिकेतील त्यांच्या उपस्थितीला एक वेगळी ओळख मिळाली.
बी. पी. सिंह हे मूळचे डेहराडूनचे होते. त्यांनी पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) येथे शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी दूरदर्शनसाठी कॅमेरामन म्हणून काम केलं आणि मनोरंजनविश्वातील प्रवासाला सुरुवात केली.
‘सिर्फ चार दिन’ या चित्रपटासह त्यांनी विविध प्रकल्पांवर काम केलं. दूरदर्शनवरील ‘एक शून्य शून्य’ या मालिकेच्या निर्मितीतही त्यांचा सहभाग होता. रहस्य आणि गूढ घटनांवर आधारित ‘आहट’ या लोकप्रिय मालिकेचेही ते निर्माते होते.
‘आहट’ आणि ‘सीआयडी’ यांसारख्या मालिकांमधून त्यांनी रहस्यप्रधान कथांना टेलिव्हिजनवर लोकप्रिय करण्यात महत्त्वाचं योगदान दिलं. त्यांच्या निधनाने भारतीय टेलिव्हिजन मनोरंजनविश्वातील एका महत्त्वाच्या व्यक्तिमत्त्वाला गमावलं आहे.