(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Madhuri Dixit: सोनी मराठीवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘कोण होणार करोडपती’ सध्या एका खास प्रसंगामुळे चर्चेत आहे. अभिनेत्री माधुरी दीक्षित या शोचं सूत्रसंचालन करत असून, नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात खान्देशी भाषेचा गोडवा आणि एका तरुणाच्या संघर्षाची भावुक कहाणी पाहायला मिळाली. धुळे जिल्ह्यातील संदीप भामरे याने आपल्या साधेपणाने आणि जिद्दीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. विशेष म्हणजे, संदीपच्या आग्रहाखातर माधुरीने अस्सल खान्देशी भाषेत संवाद साधत उपस्थितांची मनं जिंकली.
‘कोण होणार करोडपती’च्या हॉट सीटवर बसलेल्या संदीप भामरेने माधुरी दीक्षितला खान्देशी भाषेत बोलण्याची विनंती केली. संदीपचा आग्रह मान्य करत माधुरीने, “नमस्कार खानदेशकर, कसा अशेत? बरा अशेत का?” असं म्हणत खान्देशवासीयांना खास अंदाजात अभिवादन केलं. माधुरीच्या या प्रयत्नाने सेटवर टाळ्यांचा कडकडाट झाला.
खान्देशी भाषेतील आपुलकी आणि गोडव्याचं कौतुक करत माधुरीने या भाषेत एक वेगळीच जवळीक जाणवत असल्याचं सांगितलं. आपल्या आवडत्या अभिनेत्रीने स्थानिक भाषेत संवाद साधल्याने संदीपही भारावून गेला.
माधुरीला दिलं खान्देशात येण्याचं आमंत्रण
माधुरीने खान्देशी भाषेत संवाद साधल्यानंतर संदीपने तिला थेट खान्देशात येण्याचं आमंत्रण दिलं. “तुम्ही एकदा खानदेशात या. मी तुम्हाला गरमागरम बाजरीची भाकरी आणि चमचमीत ठेचा खाऊ घालेन, तुमचा आत्मा तृप्त होईल,” असं म्हणत त्याने खान्देशातील खास खाद्यसंस्कृतीची ओळख करून दिली.
यावर माधुरीनेही आपल्या घरातील खाद्यपदार्थांबद्दल एक खास गोष्ट सांगितली. तिला भाकरी खूप आवडत असल्याचं सांगत, त्यांच्या घरी पोळीपेक्षा अनेकदा भाकरीच जास्त बनवली जाते, असं तिने नमूद केलं. या संवादामुळे कार्यक्रमात मनोरंजनासोबतच खान्देशी संस्कृतीची झलकही पाहायला मिळाली.
OTT Releases: ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात मनोरंजनाची मेजवानी! हे चित्रपट-सीरिज होणार रिलीज
२५ हजारांची कमाई; संदीप भामरेच्या डोळ्यांत आले अश्रू
या भागातील सर्वांत भावुक क्षण तेव्हा पाहायला मिळाला, जेव्हा संदीप भामरेने खेळात २५ हजार रुपयांचा पहिला टप्पा यशस्वीपणे पार केला. ही रक्कम त्याच्यासाठी केवळ बक्षीस नव्हती, तर त्याच्या कुटुंबाच्या संघर्षाशी जोडलेली एक मोठी भावना होती.
भावुक झालेल्या संदीपने माधुरीला सांगितलं, “मॅडम, ही माझ्या आयुष्यातील पहिली कमाई आहे. २५ हजार रुपये ही आमच्या घरातील तब्बल सात जणांची मिळून संपूर्ण महिन्याची कमाई असते. आम्ही सगळे जण महिनाभर अतोनात कष्ट करतो, तेव्हा कुठे एवढे पैसे हातात येतात.”
संदीपचे हे शब्द ऐकून मंचावर भावनिक वातावरण निर्माण झालं. त्याच्या कुटुंबाची परिस्थिती आणि कष्टांची कहाणी ऐकून उपस्थितही भारावून गेले. एका सामान्य कुटुंबातील तरुणासाठी या मंचावर मिळालेली रक्कम किती महत्त्वाची असू शकते, याची जाणीव या प्रसंगातून झाली.
‘कोण होणार करोडपती’च्या या विशेष भागात एका बाजूला माधुरी दीक्षितचा दिलखुलास अंदाज, खान्देशी भाषेचा गोडवा आणि स्थानिक खाद्यसंस्कृती पाहायला मिळाली; तर दुसऱ्या बाजूला संदीप भामरेच्या संघर्षाने प्रेक्षकांना भावुक केलं. त्यामुळे हा भाग केवळ प्रश्नोत्तरांचा खेळ न राहता एका सामान्य कुटुंबाच्या जिद्दीची आणि आशेची कहाणी ठरला.‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता सोनी मराठी आणि सोनी लिववर पाहता येतो.






