
(फोटो सौजन्य -सोशल मीडिया)
Divya Vinekar Death: मनोरंजनविश्वातून एक दुःखद बातमी समोर येत आहे. अभिनेत्री दिव्या विनेकरचं निधन झालं आहे. आलिया भट्ट आणि शेफाली शाह यांच्या ‘डार्लिंग्स’ या चित्रपटात महिला कॉन्स्टेबलची भूमिका साकारून ती प्रेक्षकांच्या परिचयाची झाली होती. मंगळवारी तिचे निधन झाल्याची माहिती समोर आली असून, बुधवारी मुंबईत तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तिच्या निधनामुळे मनोरंजनविश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
दिव्या विनेकरच्या निधनाची बातमी तिची मैत्रीण आणि रेडिओ जॉकी रोहिणी रामनाथन हिने इन्स्टाग्रामवर भावूक पोस्ट शेअर करत दिली. दिव्या तिच्यासाठीच नव्हे, तर रेडिओ क्षेत्रात तिच्यासोबत काम करणाऱ्या अनेकांसाठी खास व्यक्ती होती, अशा भावना रोहिणीने व्यक्त केल्या. तसेच, दिव्याच्या कुटुंबीयांच्या गोपनीयतेचा आदर करावा आणि या कठीण प्रसंगातून सावरण्यासाठी त्यांना वेळ द्यावा, असं आवाहनही तिने केलं.
दिव्याच्या निधनाचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. तिच्या अचानक जाण्याने कुटुंबीय, मित्रपरिवार आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
‘डार्लिंग्स’ आणि ‘जलसा’ चित्रपटांत केलं होतं काम
दिव्या विनेकर ने २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या नेटफ्लिक्सच्या ‘डार्लिंग्स’ या चित्रपटात महिला कॉन्स्टेबलची भूमिका साकारली होती. या चित्रपटात आलिया भट्ट आणि शेफाली शाह यांच्या प्रमुख भूमिका होत्या. याशिवाय, विद्या बालन आणि शेफाली शाह यांच्या ‘जलसा’ या चित्रपटातही ती झळकली होती.
चित्रपटांबरोबरच दिव्या ने रेडिओ आणि डिजिटल कंटेंटच्या क्षेत्रातही काम केलं होतं. ती डिजिटल कंटेंट क्रिएटर, फ्रीलान्स कंटेंट रायटर आणि कवयित्री म्हणूनही कार्यरत होती. विविध माध्यमांमध्ये काम करत त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती.
दिव्याच्या आठवणींना उजाळा
दिव्याच्या निधनानंतर तिची मैत्रिणी आणि सहकाऱ्यांकडून त्यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. रोहिणी रामनाथन हिनेही आपल्या पोस्टमधून दिव्या यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. त्यांच्या जाण्याने जवळच्या व्यक्तींना मोठी पोकळी जाणवत आहे.
आरजे रोहिणी रामनाथनने तिच्या पोस्टमध्ये दिव्याच्या निधनाची बातमी शेअर केली आहे. तिने लिहिले आहे, “अत्यंत दुःख आणि धक्क्याने मी तुम्हा सर्वांना कळवत आहे की, आपल्या डीव्हीचे आज निधन झाले आहे. हे सर्व खूप अचानक आणि अनपेक्षित होते. तिचे कुटुंब आणि तिच्या प्रेमाने व आपुलकीने ज्यांच्या आयुष्याला स्पर्श केला ते सर्वजण सध्या तीव्र दुःखातून जात आहेत. कृपया या वेळी कोणतेही प्रश्न विचारू नका.”
अभिनय, रेडिओ, लेखन आणि डिजिटल कंटेंट अशा विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या दिव्या विनेकरच्या निधनामुळे मनोरंजनविश्वात शोक व्यक्त केला जात आहे.