( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)
Ganesh Chaturthi 2026: देशभरात गणेश चतुर्थीच्या उत्सवाची तयारी जोरात सुरू आहे. आसामची राजधानी गुवाहाटीमध्येही गणेशोत्सवासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. गुवाहाटीतील फाटासिल अंबारी परिसरात यंदा भगवान गणेशाची तब्बल ४५ फूट उंच इको-फ्रेंडली मूर्ती साकारण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही मूर्ती दिवंगत गायक जुबीन गर्ग यांच्या स्मृतींना समर्पित करण्यात आली आहे.
फाटासिल अंबारी परिसरातील डॉ. बी. आर. आंबेडकर यूथ क्लब आणि तेलुगू असोसिएशनने संयुक्तपणे यंदाच्या गणेशोत्सवाचं आयोजन केलं आहे. आयोजक गेल्या ४० वर्षांपासून गणेश चतुर्थीचा उत्सव साजरा करत आहेत. यापूर्वी त्यांनी ४१ फूट आणि ३५ फूट उंच गणेशमूर्तीची स्थापना केली होती. मात्र, यंदा जुबीन गर्ग यांना समर्पित करत तब्बल ४५ फूट उंच मूर्ती तयार करण्यात आली आहे.
यंदाची ही मूर्ती पर्यावरणपूरक पद्धतीने तयार करण्यात आली आहे. मूर्ती साकारताना प्लास्टिक आणि सिंथेटिक रंगांचा वापर करण्यात आलेला नाही. आयोजकांच्या म्हणण्यानुसार, ही मूर्ती ईशान्य भारतातील भगवान गणेशाची सर्वात उंच मूर्ती असल्याचं सांगितलं जात आहे.
यूथ क्लबचे सचिव सी.एच. गोविंदा यांनी सांगितलं की, यापूर्वी ४१ फूट आणि ३५ फूट उंचीच्या मूर्ती उभारण्यात आल्या होत्या. मात्र, यंदाची ४५ फूट उंच मूर्ती आसामचे प्रसिद्ध कलाकार आणि दिवंगत गायक जुबीन गर्ग यांना समर्पित करण्यात आली आहे.
मूर्तीची वैशिष्ट्यं :
गणरायाची मूर्ती तब्बल ४५ फूट उंच आहे.
मूर्ती इको-फ्रेंडली पद्धतीने तयार करण्यात आली आहे.
प्लास्टिक आणि सिंथेटिक रंगांचा वापर टाळण्यात आला आहे.
ही मूर्ती दिवंगत गायक जुबीन गर्ग यांच्या स्मृतींना समर्पित आहे.
आयोजक गेल्या ४० वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करत आहेत.
सात दिवस रंगणार गणेशोत्सव
तेलुगू असोसिएशनचे सदस्य डी.के. कामराजू यांनी सांगितलं की, यंदाचा गणेशोत्सव सात दिवसांचा असणार आहे. १४ ते २० सप्टेंबरदरम्यान विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या उत्सवासाठी स्थानिक आमदार, खासदार आणि इतर मंत्र्यांनाही आमंत्रित करण्यात आलं आहे.
जुबीन गर्ग हे आसाममधील प्रसिद्ध गायक, संगीतकार, गीतकार आणि अभिनेते होते. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीसाठीही अनेक लोकप्रिय गाणी गायली. ‘या अली’, ‘दिल तू ही बता’, ‘एक दिन तेरी राहों में’ आणि ‘दिलरुबा’ यांसारख्या गाण्यांमुळे त्यांना देशभरात लोकप्रियता मिळाली.
१९ सप्टेंबर २०२५ रोजी सिंगापूरमध्ये संशयास्पद परिस्थितीत जुबीन गर्ग यांचं निधन झालं. त्यांच्या मृत्यूच्या प्रकरणाचा तपास सुरू असून, या प्रकरणात आतापर्यंत काही जणांना अटक करण्यात आली आहे.
जुबीन गर्ग यांना समर्पित करण्यात आलेली ४५ फूट उंच गणेशमूर्ती ही त्यांच्या चाहत्यांसाठी आणि आसाममधील नागरिकांसाठी श्रद्धांजलीचा खास क्षण ठरत आहे.






