( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)
Mithun Chakraborty Farmhouse: बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते मिथुन चक्रवर्ती आपल्या अभिनयासोबतच त्यांच्या आलिशान लाइफस्टाइलसाठीही चर्चेत असतात. मात्र, एक काळ असा होता जेव्हा त्यांच्या आयुष्यात प्रचंड संघर्ष होता. फुटपाथवर झोपण्यापासून ते बॉलिवूडमधील स्टारडमपर्यंतचा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. आज मिथुन चक्रवर्ती हे त्यांच्या पिढीतील लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहेत आणि देशभरात त्यांच्या अनेक मालमत्ता आहेत. यामध्ये मुंबईतील मढ आयलंड परिसरातील त्यांच्या आलिशान फार्महाऊसचाही समावेश आहे.
मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा नमाशी चक्रवर्तीने ‘पिंकविला’ला दिलेल्या मुलाखतीत या फार्महाऊसबाबत अनेक खास गोष्टी सांगितल्या. नमाशीच्या माहितीनुसार, मिथुन चक्रवर्ती आणि त्यांच्या पत्नी योगिता बाली यांनी १९८५ मध्ये, मोठा मुलगा मिमोह चक्रवर्तीच्या जन्मानंतर काही महिन्यांनी हा बंगला खरेदी केला होता.
या घराचं नावही त्यांनी मुलाच्या नावावरून ‘मिमोह’ ठेवलं. कुटुंब काही काळ ऊटीमध्ये वास्तव्यास होतं. मुंबईत परतल्यानंतर त्यांनी मढ आयलंडमधील या बंगल्यात कायमस्वरूपी राहण्यास सुरुवात केली. त्याआधी या प्रॉपर्टीचा वापर प्रामुख्याने सुट्टीचं घर म्हणून केला जात होता.
मिथुन चक्रवर्तींचं हे फार्महाऊस तब्बल दीड एकर परिसरात पसरलेलं आहे. हिरवळीने वेढलेल्या या प्रॉपर्टीमध्ये कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी स्वतंत्र कॉटेज असल्याचं नमाशीने सांगितलं. एवढंच नाही, तर कुटुंबातील तब्बल २२ पाळीव कुत्र्यांसाठीही या फार्महाऊसमध्ये खास जागा आहे.
मिथुन चक्रवर्तींना बागकामाची प्रचंड आवड असल्याचंही नमाशीने सांगितलं. वडील जेव्हा या फार्महाऊसला भेट द्यायचे, तेव्हा ते बागकामात वेळ घालवत असत. त्यामुळे या प्रॉपर्टीमध्ये हिरवाईला विशेष महत्त्व आहे.
नमाशीने या मुलाखतीदरम्यान मिथुन चक्रवर्तींच्या संघर्षाच्या दिवसांशी संबंधित काही आठवणीही सांगितल्या. मुंबईत आल्यानंतर सुरुवातीच्या काळात त्यांच्याकडे राहण्यासाठी घर नव्हतं. त्या काळात त्यांनी तब्बल १५ दिवस पिवळ्या रंगाच्या फोक्सवॅगन बीटलमध्ये घालवल्याचं नमाशीने सांगितलं.
ही गाडी आता चालवण्याच्या स्थितीत नसली तरी मिथुन चक्रवर्तींच्या आयुष्यात तिचं खास स्थान आहे. या गाडीशी त्यांच्या अनेक आठवणी जोडलेल्या असल्यामुळे तिची आजही काळजी घेतली जाते.
या फार्महाऊसमध्ये मिथुन चक्रवर्तींच्या प्रदीर्घ कारकिर्दीची झलकही पाहायला मिळते. घरातील एका भिंतीवर त्यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार तसेच चाहत्यांनी काढलेली त्यांची चित्रं लावण्यात आली आहेत.
तर दुसऱ्या एका भिंतीवर अनेक प्रसिद्ध व्यक्तींसोबतचे मिथुन चक्रवर्तींचे फोटो पाहायला मिळतात. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचे फोटोही आहेत. तसेच मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याच्या खास क्षणाचाही फोटो या भिंतीवर पाहायला मिळतो.
अशा प्रकारे संघर्षाच्या दिवसांपासून सुरू झालेला मिथुन चक्रवर्तींचा प्रवास आज एका आलिशान फार्महाऊसपर्यंत पोहोचला आहे. त्यांच्या या प्रॉपर्टीमध्ये कुटुंबासाठी स्वतंत्र कॉटेज, २२ पाळीव श्वान, हिरवीगार बाग आणि त्यांच्या कारकिर्दीच्या आठवणी जपणाऱ्या अनेक खास गोष्टी पाहायला मिळतात.
मिथुन चक्रवर्ती यांनी १९७०च्या दशकात आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आणि अनेक दशकांपासून ते प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत.






