
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
रितेश देशमुख सध्या त्याच्या राजा शिवाजी या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाला संपूर्ण महाराष्ट्रातून भरभरून प्रेम मिळत आहे. राजा शिवाजी चित्रपट रिलीज झाल्यापासून जोरदार कमाई करत असल्याचे दिसत आहे. या चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी रितेश आणि चित्रपटाच्या टीमने एका पार्टीचे आयोजन केलं होते. या पार्टीला चित्रपटाची संपूर्ण टीम आणि रितेश देशमुख आणि जिनिलयाच्यांसह इंडस्ट्रीमधील काही जवळचे मित्रमंडळी उपस्थित होते.
या पार्टीतला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामुळे नेटकऱ्यांनी रितेशला ट्रोल करायला सुरूवात केली आहे. या व्हिडिओमध्ये रितेश बॉलीवूड गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. यावेळी त्याने महाराजांची प्रतिमा असलेला टी- शर्ट परिधान केल्याचे पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ व्हायरल होत असून त्याच्या जोरदार टीका केली जात आहे. हा महाराजांचा अपमान आहे, तसेच रितेशने मद्यपाव केल्याचा दावाही ट्रोलर्सनी केला होता. या संपूर्ण वादावर अखेर रितेशने स्पष्टीकरण दिले आहे आणि दिलगिरी सुद्धा व्यक्त केली आहे.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना रितेशने आपण मद्यपान करत नसल्याचे ठामपणे सांगितले असून, यासंदर्भात पसरत असलेल्या चर्चांनाही पूर्णविराम दिला आहे.
रितेश देशमुखने आपल्या निवेदनात म्हटले आहे, “मी मद्यपान करत नाही आणि भविष्यातही करणार नाही.” यासोबतच व्हायरल व्हिडिओमुळे निर्माण झालेल्या गैरसमजांबद्दलही त्याने स्पष्टीकरण दिले. संबंधित कार्यक्रमाला उपस्थित राहताना टी-शर्ट बदलणे राहून गेल्याचे त्याने नमूद केले. या कारणामुळे काहींच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत असल्याचेही त्याने सांगितले.
विशेष म्हणजे, रितेशने हे निवेदन शिवप्रेमी म्हणून जारी केले असून, छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आपल्या मनात असलेला आदर आणि श्रद्धा कायम असल्याचे स्पष्ट केले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर विविध प्रकारच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर अभिनेत्याने स्वतः पुढे येत संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे.
रितेश देशमुखची पोस्ट
अभिनेता Riteish Deshmukh याने सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओबाबत स्पष्टीकरण देत सर्व गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. ‘राजा शिवाजी’ चित्रपटाला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर आयोजित करण्यात आलेल्या छोटेखानी आनंदोत्सवानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
रितेशने आपल्या निवेदनात सांगितले की, “राजा शिवाजी चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी आमच्या संपूर्ण टीमने एक छोटा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यानंतरचा एक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एक शिवप्रेमी म्हणून या प्रकरणावर स्पष्टीकरण देणे माझे कर्तव्य आहे.”
यावेळी त्याने छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेला टी-शर्ट परिधान करून कार्यक्रमात सहभागी होण्यामागे कोणताही अवमान करण्याचा हेतू नसल्याचे स्पष्ट केले. “मी नम्रपणे सांगू इच्छितो की, महाराजांची प्रतिमा असलेला टी-शर्ट घालून आनंद साजरा करण्यामागे त्यांचा अनादर करण्याचा किंचितही हेतू नव्हता. हा टी-शर्ट मी चित्रपटाच्या प्रचारादरम्यान वापरत होतो. त्या दिवशीही प्रचारकार्य पूर्ण करून थेट कार्यक्रमात सहभागी झालो आणि त्यामुळे टी-शर्ट बदलणे राहून गेले,” असे त्याने म्हटले.
रितेशने स्पष्टपणे म्हटले की, “मी आजवर कधीही मद्यपान केलेले नाही आणि भविष्यातही करणार नाही. त्यामुळे माझ्याबाबत केले जाणारे आरोप वस्तुस्थितीला धरून नाहीत.” व्हायरल व्हिडिओमुळे निर्माण झालेल्या चर्चांवर त्याने यावेळी भाष्य केले.
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
रितेशने आणखी एक महत्त्वाचा खुलासा करत म्हटले की, व्हिडिओ चित्रित करणाऱ्या व्यक्तीला संबंधित कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले नव्हते. ‘राजा शिवाजी’ चित्रपटासाठी साडेतीन वर्षे मेहनत घेतलेल्या कॅमेरामागील आणि कॅमेरासमोरील सर्व कलाकार व सहकाऱ्यांचे आभार मानण्यासाठी हा छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.मात्र, आपल्या कृतीमुळे कोणाच्याही भावना दुखावल्या गेल्या असतील, तर त्याबद्दल त्याने मनापासून दिलगिरी व्यक्त केली आहे. “एक शिवप्रेमी म्हणून मी मनःपूर्वक माफी मागतो,” असे तो म्हणाला.
निवेदनाच्या शेवटी रितेशने छत्रपती शिवाजी महाराजांविषयीची आपली भावना व्यक्त करत म्हटले की, “छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांच्या श्रद्धेचे, प्रेरणेचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहेत. त्यांच्या विषयी माझ्या मनात अत्यंत आदर, प्रेम आणि निष्ठा आहे. ही भावना कायम राहील. जय शिवराय!”