(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
भारतातील लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओने आपल्या बहुप्रतिक्षित प्राइम ओरिजिनल मालिका ‘ग्राम चिकित्सालय’च्या दुसऱ्या सीझनच्या जागतिक प्रीमियरची घोषणा केली आहे. ही मालिका 23 जून 2026 रोजी भारतासह जगभरातील 240 हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
दिग्दर्शक ललितम तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या मालिकेचे लेखन वैभव सुमन आणि श्रेया श्रीवास्तव यांनी केले आहे. ‘द वायरल फीवर’ (TVF) निर्मित या हृदयस्पर्शी विनोदी नाटकाने पहिल्या सीझनपासूनच प्रेक्षकांची मने जिंकली होती. ग्रामीण भारतातील आरोग्य व्यवस्थेची वास्तववादी बाजू आणि गावकुसातील जीवनातील संघर्ष, माणुसकी, विनोद आणि नातेसंबंध यांचे प्रभावी चित्रण या मालिकेत करण्यात आले आहे.
काल्पनिक भाथकंडी गावावर आधारित असलेल्या या कथेत ग्रामीण भागातील आरोग्यसेवेपुढील आव्हाने आणि त्यावर मात करण्यासाठी झटणाऱ्या व्यक्तींची कहाणी दाखवण्यात आली आहे. दुसऱ्या सीझनमध्येही प्रेक्षकांना भावनिक, विनोदी आणि प्रेरणादायी घटनांचा संगम अनुभवायला मिळणार आहे.
प्रेक्षकांचे लाडके कलाकार पुन्हा एकदा झळकणार
या नव्या पर्वात प्रेक्षकांचे लाडके कलाकार पुन्हा एकदा झळकणार आहेत. अभिनेता अमोल पराशर मुख्य भूमिकेत परतणार असून त्याच्यासोबत आकाश मखिजा, आनंदेश्वर द्विवेदी, विनय पाठक, आकांक्षा रंजन कपूर आणि गरिमा विक्रांत सिंग हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसतील. याशिवाय, लोकप्रिय अभिनेता दिनेश लाल यादव यांचीही या सीझनमध्ये विशेष उपस्थिती असणार आहे.
पहिल्या सीझनला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर ‘ग्राम चिकित्सालय’च्या दुसऱ्या सीझनबाबत प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. ग्रामीण जीवनाचा वास्तववादी अनुभव आणि मनोरंजनाचा अनोखा संगम असलेली ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यास सज्ज आहे.‘ग्राम चिकित्सालय’ सीझन २ चा प्रीमियर 23 जून 2026 रोजी हिंदी भाषेत केवळ प्राइम व्हिडिओवर होणार आहे.
पहिला सीझन ज्या टप्प्यावर संपला, त्याच ठिकाणाहून दुसऱ्या सीझनची कथा पुढे सरकणार आहे. डॉ. प्रभात (अमोल पराशर) भाथकंडी गावातील संघर्षमय प्राथमिक आरोग्य केंद्र पुन्हा उभं करण्याच्या ध्येयाने काम करताना दिसणार आहे. गावकऱ्यांचा सुरुवातीचा अविश्वास आणि अनेक अडथळे पार करत तो हळूहळू त्यांचा विश्वास जिंकतो. मात्र, प्रत्येक यशानंतर त्याच्यासमोर नवी आव्हाने उभी राहतात. ग्रामीण भागात आरोग्यसेवा पुरवणे हे केवळ वैद्यकीय ज्ञानावर अवलंबून नसून सामाजिक, आर्थिक आणि मानवी पैलूंशीही निगडित असल्याचं या सीझनमध्ये प्रभावीपणे दाखवण्यात येणार आहे.
प्राइम व्हिडिओ इंडियाचे डायरेक्टर आणि हेड ऑफ कंटेंट लायसन्सिंग मनीष मेघानी म्हणाले, “प्रेक्षकांच्या आवडीनिवडी बदलत असून ग्रामीण भारतातील वास्तववादी कथांनाही मोठी पसंती मिळत आहे. ‘ग्राम चिकित्सालय’ने आपल्या भावनिक आणि जीवनाशी जोडलेल्या कथेमुळे प्रेक्षकांशी विशेष नातं निर्माण केलं. पहिल्या सीझनला मिळालेल्या यशानंतर या कथेला पुढे नेण्याचा आम्हाला आनंद आहे.”
मालिकेचे दिग्दर्शक ललितम तिवारी म्हणाले, “ग्रामीण जीवनाचं वास्तव आणि त्यातील आव्हानं प्रामाणिकपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे. दुसऱ्या सीझनमध्ये आरोग्यसेवा, गावातील नाती, संघर्ष आणि सामुदायिक भावना अधिक प्रभावीपणे प्रेक्षकांसमोर येतील.”
या सीझनमध्ये अमोल पराशरसोबत आकाश मखिजा, आनंदेश्वर द्विवेदी, विनय पाठक, आकांक्षा रंजन कपूर, गरिमा विक्रांत सिंग आणि दिनेश लाल यादव हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. विनोद, भावना आणि सामाजिक वास्तवाचा संगम असलेला ‘ग्राम चिकित्सालय’ सीझन २ प्रेक्षकांसाठी एक वेगळा अनुभव ठरणार आहे.






