
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
सीजेपीचे अध्यक्ष अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखाली असंख्य तरुण दिल्लीतील जंतर-मंतर येथे एकत्र आले. Gen-Z पिढीच्या या आंदोलनाला सोशल मीडियाची, विशेषतः इन्स्टाग्राम रील्सची, मोठी साथ लाभली. आंदोलनाशी संबंधित शेकडो व्हिडिओ विविध गाण्यांच्या पार्श्वसंगीतासह सोशल मीडियावर व्हायरल झाले. या रील्समुळे विद्यार्थ्यांचा आवाज देशभरातील लाखो तरुणांपर्यंत पोहोचला.
आंदोलनादरम्यान सोशल मीडियावर अनेक गाणी वापरून व्हिडिओ तयार करण्यात आले. मात्र, अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी आणि अभिनेत्री रसिका दुग्गल यांच्या ‘मंटो’ (२०१८) चित्रपटातील ‘बोल के लब आजाद हैं तेरे…’ या गाण्याने सर्वाधिक लक्ष वेधून घेतले. इन्स्टाग्राम, यूट्यूब शॉर्ट्स आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आंदोलनाशी संबंधित असंख्य व्हिडिओंमध्ये हेच गाणे पार्श्वसंगीत म्हणून वापरण्यात आले.
‘बोल के लब आजाद हैं तेरे गाणं सोशल मीडियावर ट्रेंड
विशेष म्हणजे, २०१८ मध्ये प्रदर्शित झाल्यानंतर या गाण्याला अपेक्षित लोकप्रियता मिळाली नव्हती. मात्र, जंतर-मंतर आंदोलनामुळे हे गाणं आता सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे.आंदोलन संपल्यानंतरही या गाण्यावरील रील्स आणि शॉर्ट व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, नव्या पिढीमध्ये त्याची लोकप्रियता झपाट्याने वाढताना दिसत आहे.
‘बोल के लब आजाद हैं तेरे…’ हे गाणे प्रसिद्ध गायक रशीद खान आणि विद्या शाह यांनी गायले असून, त्याला स्नेहा खानवलकर यांनी संगीत दिले आहे. या गाण्याचे बोल उर्दूतील महान कवी फैज अहमद फैज यांच्या ‘बोल के लब आजाद हैं तेरे…’ या क्रांतिकारी कवितेवर आधारित आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, अन्यायाविरोधातील आवाज आणि सामाजिक भान व्यक्त करणारी ही कविता आजही तितकीच समर्पक मानली जाते.
जंतर-मंतर आंदोलनानंतर या गाण्याला मिळालेल्या नव्या लोकप्रियतेमुळे ‘मंटो’ चित्रपटातील ही कलाकृती पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. सोशल मीडियावरील लाखो रील्समुळे आठ वर्षांपूर्वीचं हे गाणं नव्या पिढीसाठी पुन्हा एकदा प्रेरणेचं आणि अभिव्यक्तीचं माध्यम ठरत आहे.