
'जुळली गाठ गं' मालिका
दहीहंडीच्या या भागाबद्दल सावी म्हणजेच अभिनेत्री पायल मेमाणे म्हणाली की, “माझ्यासाठी हा अनुभव खूपच वेगळा आणि आव्हानात्मक होता. मला उंचीची खूप भीती वाटते आणि मी आयुष्यात कधीच हंडी फोडली नव्हती. पण सेटवर खरंच थरावर थर रचून दहीहंडी बांधली होती. मला सेफ्टी बेल्ट बांधून वर पाठवलं होतं, पण वरून खाली बघितल्यावर मी खूप घाबरले.
सगळे थर खाली पडल्यावर मी वर एकटीच लटकत होते, त्यामुळे तर मला अजूनच भीती वाटली. पण आमचे दिग्दर्शक आणि तिथे आलेल्या गोविंदा पथकाने मला खूप धीर दिला. शेवटी मी ती हंडी फोडलीच. स्वतःच्या भीतीवर मात करून काहीतरी वेगळं करायला मिळालं, याचा मला खूप आनंद आहे. हा माझ्या आयुष्यातला एक खूप खास आणि कधीही न विसरता येणारा अनुभव होता.”
पुढे ती म्हणाली की, “यापूर्वी नेहमीच दहीहंडीचा तो उत्साह पाहण्यासाठी मी जायचे. पण मी कधी हंडी फोडेन हा विचार केला नव्हता. ज्या क्षणी मी अगदी शेवटच्या थरावर चढले त्या वेळी मला प्रत्येक गोविंदाबद्दल कौतुक वाटल, त्यांच्या निर्धास्तपणाला माझ्याकडून सलाम आहे. सर्व गोविंदा पथकांना इतकच सांगेन खूप धमाल करा पण स्वतःच्या जीवाला जपा. हा सण उत्सव म्हणून साजरा करूयात स्पर्धा म्हणून नको. आणि तुमची लाडकी सावी कशी दहीहंडी फोडणार आहे हे पाहायला विसरू नका. सन मराठीवर रोज रात्री ८:३० वाजता.”