(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Kangana Ranaut On Rahul Gandhi: अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रनौत आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. आता कंगना रनौतने विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसवर केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
कंगनाच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला विरोधी पक्षाकडून संसदेत विविध विषयांवर चर्चा आणि वादविवादाची मागणी केली जात होती. मात्र, आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि सरकार चर्चेसाठी तयार असताना राहुल गांधी आणि त्यांचा गट चर्चेपासून दूर जात असल्याचा आरोप तिने केला आहे. “सरकार चर्चेसाठी तयार आहे, मग विरोधक मागे का?” असा सवाल कंगनाने उपस्थित केला.
कंगना रनौतने झारखंडमधील स्पर्धा परीक्षांमध्ये पारदर्शकता आणि निष्पक्षतेची मागणी करणाऱ्या तरुण विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईचाही मुद्दा उपस्थित केला. आपल्या भविष्यासाठी निष्पक्ष परीक्षा पद्धतीची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर बळाचा वापर का करण्यात आला, असा सवाल तिने केला.
तिने हेमंत सोरेन सरकार आणि काँग्रेसच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित करत, विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर विरोधक गप्प का आहेत, असा सवाल केला.
कंगनाने काँग्रेस आणि राहुल गांधींवर दुटप्पीपणाचा आरोप केला. तरुणांच्या हक्कांबद्दल आणि सुरक्षेबद्दल बोलणारे विरोधक विद्यार्थ्यांवरील कारवाईच्या मुद्द्यावर मात्र मौन बाळगत असल्याचं ती म्हणाली.
संसदेतील गोंधळावर भाष्य करताना कंगनाने सरकार प्रत्येक प्रश्नावर चर्चा आणि उत्तर देण्यासाठी तयार असल्याचा दावा केला. मात्र, विरोधक केवळ गोंधळ घालून चर्चा टाळत असल्याचा आरोप तिने केला.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सुरू असलेल्या कोंडीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (NDA) खासदार मंगळवारी संसदेकडे मोर्चा काढणार आहेत. जंतर मंतर येथील विद्यार्थी आंदोलकांवरील पोलीस कारवाई आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या वक्तव्यावरून विरोधकांकडून संसदेत सातत्याने गोंधळ घातला जात असल्याचा सत्ताधारी पक्षाचा आरोप आहे.
अमित शाह विद्यार्थी आंदोलनावर चर्चा करण्यास तयार आहेत, मात्र विरोधक चर्चेपासून दूर पळत आहेत, असा दावा करत NDA खासदार निषेध नोंदवणार आहेत. त्यामुळे संसदेत आधीच तापलेल्या राजकीय वातावरणात कंगना रनौतच्या वक्तव्यामुळे आणखी चर्चा रंगली आहे.
Madhuri Dixit Comeback : २४ वर्षांनंतर टीव्हीवर कमबॅक; ‘धकधक गर्ल’च्या रिअॅलिटी शोची घोषणा






