पावसाने ओढ दिली, ऊस गाळपाचं मोठं आव्हान; प्रतापगड कारखान्याची तयारी सुरू
मेढा : जावळी तालुक्यातील कृषी आणि उद्योग क्षेत्राला चालना देणाऱ्या प्रतापगड सहकारी साखर कारखान्याच्या 2026-27 गळीत हंगामाची तयारी सुरू झाली आहे. सोनगाव येथे गुडगुंटी प्रतापगड शुगर्स अँड बायोएनर्जीजच्या वतीने बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ धार्मिक आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
यावेळी प्रतापगड कारखान्याचे अध्यक्ष आणि जावळीचे सभापती सौरभबाबा शिंदे यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कारखान्याला जास्तीत जास्त ऊस देण्याचं आवाहन केलं.
प्रतापगड कारखाना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी सभासद आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं सहकार्य अत्यावश्यक आहे. भविष्यात प्रतापगड कारखाना स्वयंपूर्ण व्हावा, या उद्देशाने कर्नाटकातील गुडगुंटी शुगर्सच्या सहकार्याने व्यवस्थापन कार्यरत असल्याचं सौरभबाबा शिंदे यांनी सांगितलं.
यंदाच्या गळीत हंगामात चार लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. मात्र, यंदा पावसाने ओढ दिल्यामुळे ऊस उपलब्धतेबाबत काही प्रमाणात चिंता असल्याचंही त्यांनी नमूद केलं. त्यामुळे हंगाम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं.
सौरभबाबा शिंदे यांनी प्रतापगड कारखान्याच्या सुरुवातीच्या अडचणींचाही उल्लेख केला. कारखाना सुरळीत सुरू राहण्यासाठी अजिंक्यतारा कारखान्यानेही मदत केल्याचं त्यांनी सांगितलं.
प्रतापगड कारखाना लवकरात लवकर कर्जमुक्त होऊन स्वबळावर चालावा, यासाठी ऊस उत्पादक शेतकरी, सभासद आणि कामगारांसह सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
माजी आमदार लालसिंगराव शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांनी कारखान्याच्या माध्यमातून जावळी तालुक्याच्या विकासाचं स्वप्न पाहिलं. कारखान्यामुळे शेकडो तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. हे स्वप्न साकार करण्यासाठी शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस देऊन सहकार्य करावं, असं आवाहन त्यांनी केलं.
प्रतापगड कारखान्यामुळे जावळी तालुक्यातील सुमारे एक हजार कुटुंबांना रोजगार आणि उदरनिर्वाहाचं साधन उपलब्ध झाल्याचं सौरभबाबा शिंदे यांनी सांगितलं. डोंगराळ आणि दुर्गम भागातील हा कारखाना केवळ उद्योग नसून स्थानिकांच्या आर्थिक जीवनाचा आधार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या हस्ते बॉयलर पूजन करण्यात आलं. त्यानंतर बॉयलर अग्नी प्रदीपन करण्यात आलं.
गुडगुंटी प्रतापगड शुगर्स हे एक कुटुंब असून या कुटुंबाच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असं कारखान्याचे मुख्य जनरल मॅनेजर रविंद्र देसाई यांनी सांगितलं. हा कारखाना राज्यात नावलौकिक मिळवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला कारखान्याच्या माजी अध्यक्षा सुनेत्रा शिंदे, अध्यक्ष सौरभ शिंदे, गुडगुंटी शुगर्सचे अध्यक्ष वीरूपक्षय्या गुडगुंटी, संचालिका आशादेवी गुडगुंटी, कीर्ती गुडगुंटी, उपाध्यक्ष ॲड. शिवाजीराव मर्ढेकर, राजेंद्र भिलारे, इंद्रजित भिलारे, मच्छिंद्र मुळीक, श्रीहरी गोळे यांच्यासह संचालक, सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालक राजेंद्र फरांदे पाटील यांनी आभार मानले.
सांगली शिक्षक बँकेची ७४ वी वार्षिक सभा रविवारी; ५ टक्के लाभांशाची घोषणा, कर्जमर्यादा २० लाखांवर






