राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेनंतर भाजपचा पलटवार
Election Commission Controversy : लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार निशाणा साधला आहे. गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. मतदार यादीवरील विश्वासार्हता कमी झाली असून, निवडणूक प्रक्रियेवरही त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले.
राहुल गांधींच्या या आरोपांना आता भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्यसभा खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी पत्रकार परिषद घेत राहुल गांधींवर थेट हल्लाबोल केला.
राहुल गांधींचं राजकीय ज्ञान कमी असल्याची टीका करत, त्यांना स्वतःच्या राजकीय जागेवरही स्वबळावर विजय मिळवता येत नसल्याचा टोला त्रिवेदी यांनी लगावला. राहुल गांधींनी मांडलेल्या सत्ताविरोधी लाटेच्या मुद्द्यावरही त्यांनी काँग्रेसच्या निवडणूक इतिहासाचा दाखला देत सवाल उपस्थित केले.
Rahul Gandhi : सत्ताविरोधी लाटेपासून त्या विचित्र कायद्यापर्यंत…; राहुल गांधीनी सांगितली क्रोनोलॉजी
राहुल गांधींच्या दाव्यांवर बोलताना निवडणूक आयोगातील कथित मतभेदांचाही मुद्दा त्रिवेदी यांनी उपस्थित केला. निवडणूक आयोगाच्या निर्णयांमध्ये मतभेद असल्याचा दावा करण्यासाठी राहुल गांधींकडे ठोस पुरावे आहेत का, असा सवाल त्यांनी केला. दरम्यान, आयोगाने यापूर्वी SIRसह आपल्या निर्णयांमध्ये अंतिम पातळीवर एकमत असल्याचं म्हटलं आहे.
राहुल गांधी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. निवडणूक प्रक्रियेतील विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित करत त्यांनी 2024 च्या लोकसभा आणि काही विधानसभा निवडणुकांबाबतही गंभीर आरोप केले. तसेच देशातील सत्ताविरोधी लाटेचा मुद्दा त्यांनी पुन्हा उपस्थित केला. विशेष म्हणजे, निवडणूक आयोगाच्या Special Intensive Revision म्हणजेच SIR प्रक्रियेवरून गेल्या काही काळापासून राजकीय वातावरण तापलं आहे. आयोगाच्या अधिकाराबाबतही विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने मे 2026 मध्ये बिहारमधील SIR प्रक्रियेबाबत निर्णय देताना निवडणूक आयोगाला संविधानातील कलम 324 आणि लोकप्रतिनिधित्व कायद्यातील तरतुदींअंतर्गत मतदार यादीच्या विशेष पुनरिक्षणाचा अधिकार असल्याचं मान्य केलं होतं. त्यामुळे राहुल गांधींचे आरोप आणि भाजपचा पलटवार यामुळे निवडणूक आयोग, SIR आणि मतदार यादीचा मुद्दा पुन्हा एकदा राजकीय केंद्रस्थानी आला आहे. आता या आरोप-प्रत्यारोपांवर निवडणूक आयोगाची पुढील भूमिका काय असणार, याकडे लक्ष लागलं आहे.






