(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Kareena Kapoor :बॉलिवूडची बेबो अर्थात अभिनेत्री करीना कपूर खान पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिच्या चित्रपटांमुळे किंवा फॅशनमुळे नव्हे, तर दिवाळीत तिने परिधान केलेल्या एका खास शाही नेकलेसमुळे ती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. करीनाने पवित्र कुराणमधील आयत-अल-कुर्सी कोरलेले ३० कॅरेटचे पाचूचे पेंडंट घातले होते. याच पेंडंटवरून आता वाद निर्माण झाला असून काँग्रेस नेते आणि पक्षाचे राष्ट्रीय माध्यम समन्वयक अब्बास हाफीज यांनी करीना कपूर आणि तिची स्टायलिस्ट रिया कपूर यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
खरं तर, करीनाने दिवाळीनिमित्त तिच्या खास लूकमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोंमध्ये ती डिझायनर पुनीत बलाना यांनी डिझाइन केलेल्या बेज रंगाच्या कफ्तानमध्ये आणि त्याला साजेशी पगडी परिधान केलेली दिसली. तिच्या या शाही लूकचे सर्वाधिक लक्ष वेधून घेतले ते म्हणजे कुराणमधील आयत कोरलेल्या ३० कॅरेटच्या पाचूच्या पेंडंटने. सुरुवातीला तिच्या या लूकची बरीच चर्चा झाली होती. मात्र, आता याच दागिन्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.
करीनाचा हा संपूर्ण लूक तिची जवळची मैत्रीण आणि सेलिब्रिटी स्टायलिस्ट रिया कपूर हिने तयार केला होता. रियाने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करताना या दागिन्यांचा इतिहासही सांगितला होता. करीनाने जवळपास २०० वर्षे जुने शाही दागिने परिधान केले होते. यामध्ये भोपाळच्या नवाबांचा तुरा आणि भोपाळच्या बेगमांचा ३० कॅरेटचा पाचूचा समावेश होता. या पाचूवर आयत-अल-कुर्सी कोरलेली आहे. हे दागिने भोपाळच्या राजघराण्याचे वारसा हक्काचे असून सैफ अली खानच्या कुटुंबाकडून करीनाला मिळाले आहेत.
अब्बास हाफीज यांनी ११ नोव्हेंबर रोजी करीना कपूर आणि रिया कपूर यांना कायदेशीर नोटीस पाठवली. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या फोटो, व्हिडीओ आणि पोस्टमध्ये करीना हे पेंडंट परिधान केलेली दिसत असल्याने त्यांनी आक्षेप नोंदवला आहे.
या नोटीसमध्ये दोघींनीही त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून संबंधित फोटो आणि व्हिडीओ हटवावेत, जाहीरपणे माफी मागावी आणि भविष्यात पवित्र कुराणातील आयती असलेले दागिने अशा प्रकारे प्रदर्शित करणार नाहीत, असे आश्वासन द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
मात्र, अब्बास हाफीज यांनी करीनाच्या कपड्यांवर, तिच्या वैयक्तिक निवडीवर किंवा दागिने परिधान करण्याच्या स्वातंत्र्यावर कोणताही आक्षेप नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांचा आक्षेप केवळ पवित्र कुराणातील आयत कोरलेले लॉकेट ज्या पद्धतीने फोटोंमध्ये प्रदर्शित करण्यात आले, त्यावर आहे. त्यांच्या मते, आयत-अल-कुर्सीसारख्या पवित्र आयतीचा धार्मिक सन्मान आणि आदर राखला गेला पाहिजे.
या नोटीसमध्ये काही इस्लामिक विद्वानांच्या मतांचाही उल्लेख करण्यात आला आहे. काही विद्वान कुराणातील आयती दागिन्यांच्या स्वरूपात परिधान करण्यावर प्रश्न उपस्थित करतात. पवित्र ग्रंथांचा अनादर होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांचे मत आहे. या विषयावर वेगवेगळ्या विद्वानांची वेगवेगळी मते असल्याचेही नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.
करीना कपूरने परिधान केलेल्या या पेंडंटचा संबंध भोपाळ आणि पतौडीच्या राजघराण्याशी आहे. भोपाळचे शेवटचे शासक नवाब हमीदुल्ला खान यांची मुलगी साजिदा सुलतान या सैफ अली खानच्या आजी होत्या. त्यांचा विवाह इफ्तिखार अली खान पतौडी यांच्याशी झाला होता. त्यांचे पुत्र मन्सूर अली खान पतौडी म्हणजेच टायगर पतौडी हे सैफ अली खानचे वडील होते. अशा प्रकारे राजघराण्याच्या वारशातून हे दागिने सैफ अली खान आणि त्यानंतर करीना कपूरपर्यंत पोहोचले आहेत.
अब्बास हाफीज यांनी त्यांच्या नोटीसमध्ये भोपाळच्या बेगमांच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचा आदर राखण्याचे आवाहनही केले आहे. सोशल मीडियावर पेंडंट ज्या पद्धतीने प्रदर्शित करण्यात आले, त्यामुळे मुस्लिम समाजातील काही सदस्यांच्या आणि भोपाळच्या पूर्वीच्या राजघराण्याशी संबंधित कुटुंबांच्या भावना दुखावल्याचा दावाही त्यांनी केला आहे. यासाठी त्यांनी भोपाळच्या बेगमांच्या ऐतिहासिक परंपरा आणि पडदा पद्धतीचा उल्लेख केला आहे.
दरम्यान, अब्बास हाफीज यांनी ही नोटीस काँग्रेस पक्षाच्या वतीने नव्हे, तर वैयक्तिक क्षमतेने पाठवल्याचे स्पष्ट केले आहे. दुसरीकडे, या संपूर्ण प्रकरणावर अद्याप करीना कपूर किंवा रिया कपूर यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे आता या वादावर बेबो काय भूमिका घेणार आणि दिवाळीचे फोटो सोशल मीडियावरून हटवणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Gana Dhav Re Trailer: केदार शिंदेंच्या ‘गणा धाव रे’चा ट्रेलर प्रदर्शित; बाप्पाच्या कथेने जिंकले मन






