
( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)
Adinath Kothare New Movie: मराठी-हिंदी मनोरंजनसृष्टीत आपल्या वेगवेगळ्या भूमिकांतून अभिनयाची छाप पाडणारा अभिनेता आदिनाथ कोठारे आता एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आदिनाथ आगामी ‘मिरांडा वॉर्निंग’ या सस्पेन्स-थ्रिलर चित्रपटात पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलं असून, २७ नोव्हेंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
‘मिरांडा वॉर्निंग’च्या पोस्टरमधून आदिनाथ कोठारेचा पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेतील लूक समोर आला आहे. खाकी वर्दीत दिसणारा त्याचा रफटफ अंदाज आणि चेहऱ्यावरचा गंभीर भाव लक्ष वेधून घेतो. चित्रपटात एका खुनाचा तपास करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याची भूमिका तो साकारणार असल्याचं समोर आलं आहे.
आदिनाथने आतापर्यंत विविध प्रकारच्या भूमिका साकारत आपल्या अभिनयाची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे ‘मिरांडा वॉर्निंग’मधील त्याची पोलिस अधिकाऱ्याची भूमिका प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचा विषय ठरणार आहे.
‘मिरांडा वॉर्निंग’ची कथा एका फार्महाऊसवर घडणाऱ्या खुनाच्या घटनेभोवती फिरते. फार्महाऊसवर खून झाल्यानंतर या प्रकरणाचा शोध सुरू होतो आणि तपासादरम्यान अनेक रहस्य उलगडत जातात.
या खुनामागचं नेमकं गूढ काय आहे? या तपासात कोणकोणते धक्कादायक खुलासे होतात? या सगळ्याची उत्तरं चित्रपटात पाहायला मिळणार आहेत.
सस्पेन्स-थ्रिलरला वेगळा अंदाज देण्याचा प्रयत्न
मराठी चित्रपटसृष्टीतील सस्पेन्स आणि थ्रिलर प्रकाराला वेगळ्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न ‘मिरांडा वॉर्निंग’मधून करण्यात आला आहे. दमदार कथानक, अनुभवी कलाकार आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम मांडणी ही चित्रपटाची वैशिष्ट्यं असल्याचं निर्मात्यांकडून सांगण्यात आलं आहे.
विशेष म्हणजे, खुनाचा तपास करणारा रफटफ पोलिस अधिकारी आणि आदिनाथ कोठारेचा अभिनय हा चित्रपटाचा महत्त्वाचा भाग असणार आहे. त्यामुळे पोस्टर रिलीज झाल्यापासूनच या चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.
सचिन धोत्रे यांचं दिग्दर्शन
सतनाम फिल्म्स स्टुडिओ आणि ओपन गेट मुव्हीज यांच्या माध्यमातून ‘मिरांडा वॉर्निंग’ची निर्मिती करण्यात आली आहे. सचिन धोत्रे यांनी चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं आहे. यापूर्वी त्यांनी २०२३ मध्ये ‘गेट-टुगेदर’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. त्यानंतर ‘मिरांडा वॉर्निंग’च्या माध्यमातून त्यांनी सस्पेन्स-थ्रिलर प्रकारात वेगळा प्रयोग केला आहे.
अल्ट्रा मीडिया एंटरटेनमेंटचे सुशीलकुमार अग्रवाल आणि सुकल्प चित्रचे कल्पक जोशी यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. चित्रपटाचं लेखन रवींद्र मठाधिकारी आणि सायली मठाधिकारी यांनी केलं आहे.
आदिनाथ कोठारेसह चित्रपटात उत्तम कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे. त्यामुळे ‘मिरांडा वॉर्निंग’चा थरार २७ नोव्हेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात अनुभवता येणार आहे.