( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)
Suriya-Jyothika: दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपल सूर्या आणि ज्योतिका यांनी त्यांच्या लग्नाला २० वर्षे पूर्ण झाल्याच्या खास निमित्ताने पुन्हा एकदा आपल्या नात्याचा सुंदर उत्सव साजरा केला. या खास प्रसंगी दोघांनी क्रिश्चियन वेडिंग सेरेमनी करत एकमेकांना पुन्हा लग्नाची वचने दिली. विशेष म्हणजे, या सोहळ्याला त्यांची मुलं दिया आणि देव यांच्यासह कुटुंबीय आणि जवळचे मित्रही उपस्थित होते.
सूर्या आणि ज्योतिकाने या खास सोहळ्याचा एक सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ज्योतिका पांढऱ्या रंगाच्या वेडिंग गाऊनमध्ये मुलगा देवचा हात धरून वेडिंग व्हेन्यूमध्ये प्रवेश करताना दिसते. दुसरीकडे मुलगी दिया सूर्यासोबत उभी असल्याचे पाहायला मिळते.
यानंतर सूर्या आणि ज्योतिका एकमेकांसमोर उभे राहतात आणि पुन्हा एकदा लग्नाची वचने देतात. या क्षणी दोघेही भावुक झाल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. या सोहळ्यातील नव्या फोटोंसोबत त्यांच्या खास क्षणांची झलकही पाहायला मिळते. सूर्या यांचा भाऊ आणि अभिनेता कार्थी देखील या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाल्याचे दिसते.
ज्योतिकाने हा व्हिडीओ शेअर करताना त्यांच्या नात्याबद्दल भावुक पोस्टही लिहिली. हा सोहळा एखाद्या ‘परफेक्ट मॅरेज’चा उत्सव नसून, गेल्या दोन दशकांत त्यांच्या नात्यात आलेल्या चढ-उतारांचा उत्सव असल्याचे तिने म्हटले.
प्रेम, समजूतदारपणा, तडजोड, त्याग आणि एकमेकांना स्वीकारण्याच्या प्रवासातून त्यांचं नातं अधिक घट्ट झाल्याचं ज्योतिकाने सांगितलं. २० वर्षे एकत्र घालवल्यानंतर ते केवळ त्यांच्या नात्याचा नाही, तर एकमेकांच्या आयुष्यात आल्यामुळे ते जसे घडले त्या व्यक्तिमत्त्वाचाही उत्सव साजरा करत असल्याचं तिने नमूद केलं.
ज्योतिकाने सूर्यासाठीही खास शब्द लिहिले. आपल्या आयुष्यात सुरक्षितता आणि सन्मान देणारा जोडीदार मिळाल्याबद्दल तिने सूर्या यांचे आभार मानले. आपल्या मुलांबद्दलही तिने भावना व्यक्त केल्या.
एक आई म्हणून आपल्या मुलांनी आई-वडिलांची प्रेमकहाणी पाहून आनंदी व्हावं आणि भविष्यात त्यांनाही अशाच नात्याची इच्छा वाटावी, अशी अपेक्षा ज्योतिकाने व्यक्त केली.
ज्योतिकाने सूर्यासोबतच्या मैत्रीचाही उल्लेख केला. तिच्यासाठी सूर्या केवळ पती नसून, तिच्या बरोबरीने उभा राहणारा मित्र, विश्वासू साथीदार आणि तिच्या मनातील गोष्टी जाणणारा व्यक्ती असल्याचं तिने सांगितलं.
यासोबतच तिने स्वतःला ‘इम्परफेक्ट वाइफ’ म्हणत हलक्याफुलक्या अंदाजात आपल्या नात्याबद्दल भाष्य केलं. कधी एकमेकांशी वाद होणे आणि त्यानंतर पुन्हा एकमेकांना समजून घेणे, या प्रक्रियेमुळे त्यांचं नातं अधिक मजबूत होत असल्याचं तिच्या पोस्टमधून दिसून आलं.
सूर्या आणि ज्योतिकाची प्रेमकहाणी दोन दशकांहून अधिक जुनी आहे. दोघांची पहिली भेट १९९९ मध्ये ‘पूवेलम केट्टुप्पर’ या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. एकत्र काम करताना त्यांची मैत्री झाली आणि पुढे या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं.
काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी ११ सप्टेंबर २००६ रोजी लग्न केलं. आता लग्नाला २० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सूर्या आणि ज्योतिका यांनी पुन्हा एकदा लग्नाची वचने घेत आपल्या नात्यातील प्रेम, मैत्री आणि कुटुंबीयांची साथ यांचा खास पद्धतीने उत्सव साजरा केला आहे.






