
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Afratafri Marathi Movie : आगामी मराठी चित्रपट ‘अफरातफरी’मधील ‘होऊन जाऊ दे’ हे नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ग्लॅमरस अंदाज, रंगीबेरंगी रोषणाई, मस्तीचा मूड आणि ठेका धरायला लावणारं संगीत यामुळे हे गाणं लक्ष वेधून घेत आहे. ‘केरळा स्टोरी’ फेम अभिनेत्री प्रणाली घोगरे हिचा आकर्षक अंदाजही या गाण्यात पाहायला मिळत आहे.
‘होऊन जाऊ दे’ या गाण्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण गाणं ४८ फ्रेम्स प्रति सेकंद या वेगाने लिपसिंक करण्यात आलं आहे. मराठी चित्रपटात संपूर्ण गाण्यावर अशा पद्धतीचा प्रयोग पहिल्यांदाच करण्यात आल्याचा दावा निर्मात्यांकडून करण्यात आला आहे.
यापूर्वी १९९२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जो जीता वही सिकंदर’ चित्रपटातील आमिर खानवर चित्रित करण्यात आलेल्या ‘पहला नशा, पहला खुमार’ या गाण्यात ४८ फ्रेम्स प्रति सेकंद या वेगाने लिपसिंक करण्याचा प्रयोग करण्यात आला होता. मात्र, संपूर्ण गाणं याच पद्धतीने लिपसिंक करून चित्रित करणं तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक असल्याचं सांगण्यात आलं आहे.
पत्त्यांचा खेळ अन् ग्लॅमरस अंदाज
गाण्यात पत्त्यांचा खेळ, झगमगणारं वातावरण आणि कलाकारांचा बिनधास्त अंदाज पाहायला मिळतो. त्यामुळे ‘होऊन जाऊ दे’ हे गाणं ‘अफरातफरी’च्या मस्तीखोर विश्वाला साजेसं ठरतं.
मुग्धा कऱ्हाडे यांच्या दमदार आवाजाने हे गाणं सजलं आहे. वरुण लिखाते यांनी संगीत दिलं असून मंदार चोळकर यांनी गीत लिहिलं आहे. तर राहुल ठोंबरे यांनी नृत्यदिग्दर्शन केलं आहे.
‘पहिल्याच ठेक्यावर पाय थिरकायला हवेत’
गाण्याबद्दल संगीत दिग्दर्शक वरुण लिखाते म्हणाले, “‘होऊन जाऊ दे’ हे गाणं तयार करताना त्यातली मस्ती, उत्साह आणि ग्लॅमर प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. गाण्याचा मूडच असा आहे की, पहिल्याच ठेक्यावर पाय थिरकायला हवेत.”
मुग्धा कऱ्हाडे यांच्या आवाजामुळे गाण्याला वेगळी ऊर्जा मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं. ‘अफरातफरी’च्या धमाल वातावरणाला साजेसं हे गाणं प्रेक्षकांना नक्कीच एन्जॉय करायला लावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दिग्दर्शक मिलिंद झुंबर कवडे यांनीही या प्रयोगाबद्दल माहिती दिली. “गाण्यात ४८ फ्रेम्स प्रति सेकंद या वेगाने संपूर्ण गाणं लिपसिंक करण्याचा प्रयोग आम्ही केला आहे. हा प्रयोग शूटिंगच्या दृष्टीने आणि तांत्रिकदृष्ट्याही खूप आव्हानात्मक होता,” असं त्यांनी सांगितलं.
गाण्याच्या प्रत्येक ठेक्याशी आणि कलाकारांच्या हालचालींशी लिपसिंक अचूक जुळवणं गरजेचं असल्याने शूटिंगदरम्यान बारकाईने काम करावं लागल्याचं दिग्दर्शकांनी सांगितलं.
९ ऑक्टोबरला ‘अफरातफरी’ होणार रिलीज
मिलिंद झुंबर कवडे दिग्दर्शित ‘अफरातफरी’ चित्रपटाची निर्मिती स्कायलाईन सिनेमॅटिक आणि येन मुव्ही स्टुडिओज यांनी केली असून, आऊट ऑफ द बॉक्स फिल्म्सचा सहयोग आहे.
या चित्रपटात मोहन आगाशे, शशांक शेंडे, संजय नार्वेकर, ओंकार भोजने, नेहा खान, प्राजक्ता हनमघर, असावरी जोशी, हेमंत पाटील आणि किरण माने यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
‘अफरातफरी’ हा चित्रपट ९ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.