(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Amey Wagh: आपल्या दर्जेदार आणि प्रेक्षकांच्या मनाला भिडणाऱ्या आशयासाठी ओळखल्या जाणाऱ्या द व्हायरल फीव्हर (TVF) ने आता मराठी मनोरंजनविश्वात दमदार पाऊल ठेवले आहे. टीव्हीएफने आपल्या पहिल्या मराठी चित्रपटाची घोषणा केली असून ‘बायंगी : पळायची नाही, टाळायची!’ या अनोख्या चित्रपटातून मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे.
अलौकिक लोककथांच्या विश्वातून एक रंजक आणि मनोरंजक कथा प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात येणार आहे. दमदार विषय, भन्नाट कथा आणि लोकप्रिय कलाकारांची फौज यामुळे ‘बायंगी : पळायची नाही, टाळायची!’ या चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन ‘गुल्लक सीझन ५’चे दिग्दर्शक अभय राऊत यांनी केले आहे. अभिनेता अमेय वाघ (Amey Wagh)या चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. त्याच्यासोबत हार्दिक जोशी, मनमीत पेम आणि अविनाश खेडेकर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका पाहायला मिळणार आहेत.
लोककथा, अलौकिक विश्व आणि मनोरंजनाचा भन्नाट मेळ या चित्रपटात पाहायला मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे टीव्हीएफची ही पहिली मराठी सिनेमॅटिक इनिंग प्रेक्षकांसाठी वेगळी आणि रंजक ठरण्याची शक्यता आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून टीव्हीएफने प्रेक्षकांच्या दैनंदिन आयुष्याशी जोडलेल्या कथा आणि प्रभावी आशयाच्या वेब सीरिज प्रेक्षकांसमोर आणल्या आहेत. ‘पंचायत’, ‘गुल्लक’, ‘कोटा फॅक्टरी’, ‘अॅस्पिरंट्स’, ‘टीव्हीएफ पिचर्स’, ‘ये मेरी फॅमिली’, ‘क्युबिकल्स’ आणि ‘पर्मनंट रूममेट्स’ यांसारख्या मालिकांनी टीव्हीएफला वेगळी ओळख मिळवून दिली आहे.
२०२६ मध्ये टीव्हीएफचे आतापर्यंत नऊ शो प्रदर्शित झाले आहेत. यामध्ये सोनी लिव्हवरील ‘गुल्लक सीझन ५’, अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवरील ‘सप्ने व्हर्सेस एव्हरीवन सीझन २’ आणि ‘अॅस्पिरंट्स सीझन ३’, नेटफ्लिक्सवरील ‘हॅलो बच्चो सीझन १’ तसेच जिओहॉटस्टारवरील ‘स्पेस जेन : चांद्रयान सीझन १’ यांचा समावेश आहे.
‘प्राइम व्हिडिओ प्रेझेंट्स’ या कार्यक्रमात टीव्हीएफने ‘वन’ आणि ‘कॉलेज फेस्ट’ यांसारख्या चित्रपटांसह अनेक मोठ्या प्रोजेक्ट्सची घोषणा केली होती. आता ‘बायंगी : पळायची नाही, टाळायची!’ या चित्रपटाच्या माध्यमातून टीव्हीएफ मराठी चित्रपटसृष्टीत आपली नवी ओळख निर्माण करण्यासाठी सज्ज झाला आहे.
View this post on Instagram
All The Best : महाराष्ट्र गाजवल्यानंतर ‘ऑल दि बेस्ट’चा डंका सातासमुद्रापार, तारखा जाणून घ्या…
२०१२ मध्ये अरुणाभ कुमार यांनी स्थापन केलेले द व्हायरल फीव्हर (TVF) हे भारतातील आघाडीचे डिजिटल-फर्स्ट कंटेंट स्टुडिओ म्हणून ओळखले जाते. गेल्या दशकभरात टीव्हीएफने स्केचेस, मिनी-सिरीज आणि दीर्घ स्वरूपाच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून भारतीय मनोरंजनविश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
टीव्हीएफच्या सात मूळ मालिकांना IMDbच्या ‘टॉप २५० टीव्ही शोज ऑफ ऑल टाइम’ या यादीत स्थान मिळाले आहे. ही कामगिरी करणारा टीव्हीएफ हा एकमेव भारतीय स्टुडिओ असल्याचा दावा करण्यात आला आहे.
पडद्यावरची लेक झाली खऱ्या आयुष्यातही खास; अभिनेत्रीच्या लग्नात अभिनेत्याने निभावली वडिलांची भूमिका
यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुकसह प्राइम व्हिडिओ, नेटफ्लिक्स, सोनी लिव्ह, झी५ आणि जिओहॉटस्टार यांसारख्या प्रमुख ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून टीव्हीएफचा आशय जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो. तमिळ, तेलुगू आणि आता मराठी भाषेतील आशय निर्मितीवरही टीव्हीएफने भर दिला आहे. ‘लाईट्स. कॅमेरा. एक्सपेरिमेंट.’ या तत्त्वज्ञानासह टीव्हीएफ भारतीय कथाकथनाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न करत आहे.






