(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Bhootam Bhayam Movie: मराठी सिनेसृष्टीत ‘भूतम भय्यम’ या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. दंतकथेच्या जगाभोवती उलगडणाऱ्या या सिनेमात मित्रांचा एक ग्रुप एका गूढ नाण्याच्या रहस्यात अडकतो. या वेगळ्या संकल्पनेला पडद्यावर साकारण्यासाठी संपूर्ण टीमने जवळपास दोन वर्षं मेहनत घेतली. विशेष म्हणजे कलाकारांच्या कास्टिंगपासून ते वर्कशॉप, व्हिज्युअल लँग्वेज आणि बॅकग्राउंड म्युझिकपर्यंत अनेक गोष्टींवर दिग्दर्शक आणि टीमने सुरुवातीपासूनच बारकाईने काम केलं.
‘भूतम भय्यम’साठी Orange Juice Gangला कास्ट करण्याचा विचार सुरुवातीपासूनच होता. कलाकारांना प्रत्यक्ष भेटल्यानंतर त्यांचं कास्टिंग फायनल करण्यात आलं. त्यानंतर जवळपास २५ दिवस कलाकारांसोबत वर्कशॉप घेण्यात आलं.
या वर्कशॉपमध्ये स्क्रिप्ट रीडिंग, कॅरेक्टरायझेशन, वेगवेगळे गेम्स आणि विविध गोष्टी एक्सप्लोर करण्यापासून अनेक मूलभूत बाबींवर काम करण्यात आलं. या संपूर्ण प्रक्रियेमुळे कलाकारांना आपल्या व्यक्तिरेखा समजून घेण्यासोबतच एकमेकांना जाणून घेण्याची संधी मिळाली.
पडद्यावरच्या मैत्रीसाठी वर्कशॉपचा मोठा फायदा
चित्रपटातील मित्रांच्या ग्रुपमधील नातं सहज आणि नैसर्गिक दिसावं यासाठी या वर्कशॉपचा मोठा फायदा झाल्याचं दिग्दर्शकांनी सांगितलं. शूटिंग सुरू होण्यापूर्वीच कलाकारांनी एकमेकांसोबत बराच वेळ घालवल्यामुळे त्यांच्यात चांगलं बॉन्डिंग तयार झालं.
याच बॉन्डिंगचा परिणाम चित्रपटातही पाहायला मिळणार आहे. कॅमेऱ्यासमोर केवळ अभिनय करण्यापेक्षा कलाकारांनी प्रत्यक्षात एकमेकांना समजून घेतल्यामुळे त्यांच्या नात्यातील सहजता पडद्यावर उतरली.
व्हिज्युअल लँग्वेजवरही बारकाईने काम
‘भूतम भय्यम’च्या जगाची निर्मिती करताना व्हिज्युअल लँग्वेजवरही विशेष लक्ष देण्यात आलं. प्रॉडक्शन डिझायनर, डीओपी, कॉस्च्युम डिझायनर आणि लूक डिझायनर अशा विविध विभागांनी एकत्रितपणे काम करत या सिनेमाला वेगळं रूप देण्याचा प्रयत्न केला.
प्री-प्रॉडक्शनच्या टप्प्यातही मोठ्या प्रमाणावर तयारी करण्यात आली. दंतकथा, मिस्ट्री आणि वेगवेगळ्या व्यक्तिरेखांचं जग प्रेक्षकांसमोर प्रभावीपणे उभं करण्यासाठी टीमने सुरुवातीपासूनच नियोजन केलं.
बॅकग्राउंड म्युझिकवर स्क्रिप्टिंगपासूनच काम
या चित्रपटाच्या संगीतावरही सुरुवातीपासूनच काम करण्यात आलं. म्युझिक डायरेक्टर श्रीनाथ मातरे आणि त्यांची टीम स्क्रिप्ट रायटिंगच्या प्रक्रियेपासूनच संगीत आणि बॅकग्राउंड म्युझिकवर काम करत होती.
चित्रपटातील गाण्यांची मेकिंगही वेगळ्या पद्धतीने करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अनेक ठिकाणी कॉयरचा वापर करण्यात आला असून जवळपास ३० ते ४० मुलांनी बॅकग्राउंड म्युझिकसाठी दोन-तीन महिने रिहर्सल केली.
दिग्दर्शकांच्या मते, या सर्व प्रक्रियेमुळे चित्रपटाचा एक वेगळा आणि युनिक थेटरिकल एक्सपीरियन्स तयार झाला आहे. संपूर्ण टीमने जवळपास दोन वर्षं ‘भूतम भय्यम’ उभा करण्यासाठी मेहनत घेतली.
या चित्रपटाचं जग उभं करणं, त्यातील व्यक्तिरेखा, कथा आणि मिस्ट्री प्रेक्षकांसाठी एक्साइटिंग करणं ही दिग्दर्शक म्हणून सर्वात आव्हानात्मक आणि तितकीच उत्साहाची बाब होती. त्यामुळे ‘भूतम भय्यम’ची संपूर्ण निर्मिती प्रक्रिया दिग्दर्शकांसाठी एक वेगळा अनुभव ठरली आहे.






