(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
अनुराग कश्यप यांनी एका मुलाखतीदरम्यान ऑस्करसाठी भारताकडून होणाऱ्या चित्रपटांच्या निवडीवर नाराजी व्यक्त केली. ऑस्करसारख्या मोठ्या आंतरराष्ट्रीय मंचावर भारताकडून अनेकदा चुकीच्या चित्रपटांची निवड केली जाते, असं त्यांनी म्हटल्याचं सांगितलं जात आहे.
त्यांच्या या वक्तव्याची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. यानंतर ‘गोंधळ’चे दिग्दर्शक संतोष डावखर यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून अनुराग कश्यपांना उत्तर दिलं.
‘आधी चित्रपट पाहा’, संतोष डावखरांचा सल्ला
संतोष डावखर यांनी आपल्या पोस्टमध्ये सर्वांना आधी चित्रपट पाहण्याचं आवाहन केलं आहे. यावेळी त्यांनी अनुराग कश्यप यांच्यासोबत झालेल्या जुन्या भेटीचाही उल्लेख केला.
संतोष यांच्या म्हणण्यानुसार, २६ एप्रिल रोजी बंगळुरूहून मुंबईला जाणाऱ्या विमानात त्यांची आणि अनुराग कश्यप यांची भेट झाली होती. संतोष यांनी सांगितलं की, ते अनुराग कश्यप आणि त्यांच्या चित्रपटांचा खूप आदर करतात.
या भेटीदरम्यान रात्री सुमारे ११.५५ वाजता त्यांनी स्वतः अनुराग कश्यप यांना आपल्या ‘गोंधळ’ चित्रपटाबद्दल सांगितलं होतं. त्यावेळी अनुराग यांनी आपण या चित्रपटाबद्दल याआधी ऐकलंही नाही आणि तो पाहिलाही नसल्याचं सांगितलं होतं.
संतोष यांच्या म्हणण्यानुसार, त्यानंतर अनुराग कश्यप यांनी ‘गोंधळ’ पाहणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र, त्यानंतर मुंबईत हा चित्रपट कुठेही प्रदर्शित किंवा दाखवला गेला नसल्याचं संतोष यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
याच मुद्द्यावर त्यांनी प्रश्न उपस्थित करत, चित्रपट पाहिलाच नसेल तर त्याला चुकीचा कसा ठरवता येईल? असा सवाल केला. कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी प्रेक्षक आणि समीक्षकांनी चित्रपट पाहावा, असं आवाहनही त्यांनी केलं.
‘गोंधळ’ आहे मानसशास्त्रीय थरारपट
संतोष डावखर यांनी ‘गोंधळ’ हा मानसशास्त्रीय थरारपट असल्याचं स्पष्ट केलं आहे. मराठी संस्कृतीचा गाभा आणि आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांना आकर्षित करणारा विषय लक्षात घेऊन हा चित्रपट तयार करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
तसंच हा चित्रपट कोणत्याही प्रतिष्ठित चित्रपट कुटुंबातील व्यक्तीने तयार केलेला नसून, चित्रपटसृष्टीबाहेरील एका नव्या आणि उत्साही निर्मात्याने बनवल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
संतोष यांनी आपल्या पोस्टमध्ये ‘गोंधळ’ हा केवळ छोट्या पडद्यासाठी किंवा ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी तयार केलेला चित्रपट नसल्याचंही सांगितलं. मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना चित्रपटाचा अनुभव मिळावा, यासाठी तो तयार करण्यात आल्याचं त्यांनी नमूद केलं.
ऑस्करसारख्या जागतिक मंचावर भारताचं प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी आपल्याला पूर्णपणे समजते, असंही संतोष यांनी म्हटलं आहे.
आता ‘गोंधळ’च्या ऑस्कर निवडीवरून सुरू झालेल्या या चर्चेत पुढे आणखी कोणत्या प्रतिक्रिया येतात आणि अनुराग कश्यप यावर पुन्हा काही बोलतात का, याकडे चित्रपटप्रेमींचं लक्ष लागलं आहे.






