
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Janhavi Killekar: अभिनेत्री जान्हवी किल्लेकर सध्या तिच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आहे. कोल्हापूरला गेल्यानंतर बिस्लेरीच्या पाण्याने अंघोळ करत असल्याचं तिने सांगितल्यानंतर सोशल मीडियावर तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. या ट्रोलिंगनंतर आता जान्हवीने एक व्हिडीओ शेअर करत आपली बाजू स्पष्ट केली आहे. यावेळी तिने आपल्या त्वचेला झालेल्या समस्यांचे फोटोही दाखवले आणि या सगळ्यामागचं कारण सांगितलं.
जान्हवीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ट्रोलिंगवर नाराजी व्यक्त केली. चार व्ह्यूज, लाईक्स आणि फॉलोअर्स वाढवण्यासाठी एखाद्या महिलेचा अपमान करणं योग्य नसल्याचं तिने म्हटलं.
ती म्हणाली, “आपल्या समाजात माणुसकी ढासळत चालली आहे. चार व्ह्यूज वाढवण्यासाठी, चार लाईक, फॉलोअर्स वाढवण्यासाठी एखाद्या स्त्रीचा कितीही अपमान केला तरी चालतो. ज्या ज्या लोकांनी माझ्या नावाने व्हिडीओ बनवले आहेत, त्यांचे मनापासून आभार.”
यानंतर तिने बिस्लेरीच्या पाण्यावरून झालेल्या वादावर भाष्य केलं. “तुम्ही फक्त रील बघता, जी ३० सेकंदांची असते, ६० सेकंदांची असते. त्याच्यात हे अर्धसत्य आहे. पण त्यासाठी तुम्हाला पूर्ण पॉडकास्ट पाहायला लागेल. कारण त्या पॉडकास्टमध्ये मी खूप स्पष्टपणे म्हटलंय की, मी शूटिंगसाठी जेव्हा जेव्हा कुठे आउटडोअरला जाते, त्यावेळी मला या गोष्टी कराव्या लागतात,” असं जान्हवीने स्पष्ट केलं.
आपल्या त्वचेला नेमकी कोणती समस्या झाली होती, याबद्दलही जान्हवीने सविस्तर सांगितलं. २०१९-२० मध्ये मालिकेच्या शूटिंगदरम्यान मुंबईबाहेर एका ठिकाणी राहत असताना हा त्रास सुरू झाल्याचं तिने सांगितलं.
“मी एका मालिकेच्या शूटिंगदरम्यान मुंबईच्या बाहेर आउटडोअर शूटिंगसाठी एका ठिकाणी राहत होते. तिथे राहताना एक महिना झाला. मी छान अशा स्किनने त्या मालिकेच्या शूटिंगसाठी गेले होते. पण महिनाभरात माझा फेस पूर्ण पिंपल्सने भरला,” असं तिने सांगितलं.
यानंतर तिने उपचार घेतले आणि स्थानिक डॉक्टरांचा सल्लाही घेतला. त्यावेळी डॉक्टरांनी पाण्यामुळे त्वचेची समस्या होत असल्याची शक्यता व्यक्त केल्याचं जान्हवीने सांगितलं.
‘तिथलं पाणी मला सूट होत नव्हतं’
जान्हवीच्या म्हणण्यानुसार, डॉक्टरांनी तिला तिथलं पाणी सूट होत नसल्याचं सांगितलं. अशा प्रकारचा त्रास केवळ सेलिब्रिटींनाच नव्हे, तर कोणालाही होऊ शकतो, असंही तिने स्पष्ट केलं.
“आपल्याला कधी कधी तिथलं पाणी सूट होत नाही, ही खरी गोष्ट आहे. ही फक्त सेलिब्रिटींना लागू होत नाही, अभिनेत्रींनाच लागू होत नाही, हे सगळ्यांना लागू होतं. मी फार स्पष्ट बोलते ना, हा माझा प्रॉब्लेम आहे,” असं जान्हवी म्हणाली.
तिने आपल्या स्किनच्या समस्येचे फोटो दाखवत त्या काळात मेकअपच्या मदतीने त्वचेवरील डाग आणि पिंपल्स झाकण्याचा प्रयत्न केल्याचंही सांगितलं. मात्र, त्याचा फारसा फायदा झाला नसल्याचं तिने म्हटलं.
‘स्किनसाठी लाखो रुपये मोजले’
या समस्येनंतर आपल्या त्वचेवर उपचार करण्यासाठी मोठा खर्च केल्याचा दावा जान्हवीने केला. अभिनेत्री म्हणून आपल्याला चांगलं दिसणं गरजेचं असल्यामुळे आपण हे सगळं केल्याचं तिने सांगितलं.
“त्याच्यानंतर मी माझ्या स्किनसाठी लाखो रुपये मोजलेले आहेत. माझी ऐपत नसताना सुद्धा. का तर मी एक अभिनेत्री आहे आणि मला छान दिसायचंय आणि त्याच्यामुळे मी या गोष्टी पाळते,” असं ती म्हणाली.
बिस्लेरीच्या पाण्यावरून झालेल्या ट्रोलिंगवरही तिने सवाल केला. “बिस्लेरीची बाटली किती रुपयांना मिळते ती? ६०-७० रुपयाला? ५० रुपयाला ती बाटली मिळते बिस्लेरीच्या पाण्याची. त्यात काय एवढं महाग आणि काय खर्चिक केलं मी?” असा प्रश्न तिने उपस्थित केला.
‘कोल्हापूरचं पाणी चांगलंच आहे’
आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेतला जात असल्याचंही जान्हवीने स्पष्ट केलं. कोल्हापूरच्या पाण्याबद्दल आपण वाईट बोलले नसल्याचं तिने सांगितलं.
“राहिला प्रश्न कोल्हापूरच्या पाण्याचा, तर कोल्हापूरचं पाणी चांगलंच आहे. हे मी त्या व्हिडीओमध्ये सुद्धा बोललेली आहे,” असं जान्हवीने स्पष्ट केलं.
‘मी काहीही चुकीचं बोललेली नाहीये’
व्हिडीओच्या शेवटी जान्हवीने आपली भूमिका आणखी स्पष्ट केली. आपण चुकीचं बोलले असल्याचं सिद्ध झाल्यास माफी मागण्यास तयार असल्याचं तिने म्हटलं.
“सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी काहीही चुकीचं बोललेली नाहीये. जर मी चुकीचं बोलले असते तर अख्ख्या कोल्हापूरचे, अख्ख्या महाराष्ट्राचे मी पाय धरून माफी मागायला सुद्धा तयार आहे. तेवढी माझी ताकद आहे. पण मी एकही वाक्य चुकीचं बोललेली नाहीये,” असं जान्हवी म्हणाली.
पुढे ती म्हणाली, “मीसुद्धा महाराजांचीच मुलगी आहे. त्याच्यामुळे मी मोडेन पण मी वाकणार नाही. जर मी चुकीचं बोलले असेन तर मी १०० वेळा माफी मागेन. पण जर मी चुकलेले नाहीये तर ते सॉरी बॉस, मी नाही माफी मागणार.”
शेवटी कोल्हापूरच्या आईकडे प्रार्थना करत तिने म्हटलं, “कोल्हापूरची आई तुम्हाला सद्बुद्धी देवो, हीच आईकडे प्रार्थना करेन मी.”
जान्हवीच्या या स्पष्टीकरणानंतर बिस्लेरीच्या पाण्यावरून सुरू झालेल्या वादाला आता नवं वळण मिळालं आहे.