(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Maan Marathi Movie: मराठी चित्रपटसृष्टीत एका नव्या आणि वेगळ्या विषयाची भर पडणार आहे. आशुतोष गोवारीकर, झी स्टुडिओज आणि दिग्दर्शक रोहन मापुस्कर हे तिघे पहिल्यांदाच ‘मान’ या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. या चित्रपटाचे नुकतेच मोशन पोस्टर प्रदर्शित करून घोषणा करण्यात आली. विशेष म्हणजे, निर्माता म्हणून आशुतोष गोवारीकर यांचा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. ‘मान’ हा चित्रपट ४ जून २०२७ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
चित्रपटाच्या मोशन पोस्टरमध्ये भेगाळलेली जमीन आणि त्या जमिनीवरून एकाच दिशेने मार्गक्रमण करणाऱ्या शेकडो स्त्रिया दिसत आहेत. या दृश्यातून स्त्रियांच्या आयुष्यातील संघर्ष, कष्ट, जिद्द आणि एकजुटीची ताकद अधोरेखित होते. सामान्य स्त्रियांच्या आयुष्याकडे आणि त्यांच्या सामूहिक शक्तीकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन ‘मान’ या चित्रपटातून मांडला जाणार असल्याचे पोस्टरवरून दिसते.
आशुतोष गोवारीकरांची पहिली मराठी निर्मिती
आशयपूर्ण आणि विचार करायला लावणाऱ्या कथा प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी ओळखले जाणारे निर्माते आशुतोष गोवारीकर या चित्रपटातून पहिल्यांदाच मराठी चित्रपटाची निर्मिती करत आहेत. याबद्दल बोलताना ते म्हणाले, “चित्रपटाची निर्मिती करताना मला नेहमीच अशा कथांचा शोध असतो, ज्या मनोरंजनासोबतच विचार करायलाही भाग पाडतात. ‘मान’ची संकल्पना माझ्यापर्यंत आली, तेव्हा त्यातील विषयाने आणि त्याच्या व्याप्तीने मला विशेष आकर्षित केले. मराठी भाषेशी आणि संस्कृतीशी माझं नातं कायमच जिव्हाळ्याचं राहिलं आहे. त्यामुळे निर्माता म्हणून माझ्या पहिल्या मराठी चित्रपटासाठी हा विषय निवडला जाणं माझ्यासाठी विशेष आनंदाची गोष्ट आहे.”
रोहन मापुस्कर करणार चित्रपटाचे दिग्दर्शन
‘मान’चे दिग्दर्शन रोहन मापुस्कर करणार आहेत. या चित्रपटातून अनेक स्त्रियांचा जीवनप्रवास आणि त्यांचे भावविश्व उलगडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. याबद्दल दिग्दर्शक रोहन मापुस्कर म्हणाले, “अनेक स्त्रियांच्या जीवनप्रवासाचा आणि त्यांच्या भावविश्वाचा वेध घेणारा हा चित्रपट आहे. या विषयाकडे पाहताना त्यातील प्रत्येक व्यक्तिरेखेचा प्रवास, तिची धडपड आणि जगण्यातील बारकावे प्रामाणिकपणे पडद्यावर आणणं माझ्यासाठी महत्त्वाचं आहे.”
‘मान’ या चित्रपटाचे लेखन अमित मेहता आणि आशुतोष गोवारीकर यांनी केले आहे, तर संवादलेखनाची जबाबदारी अरविंद जगताप यांनी सांभाळली आहे. झी स्टुडिओज आणि गोवारीकर पिक्चर्सची सहनिर्मिती असलेल्या या चित्रपटाचे निर्माते झी स्टुडिओज, सुनीता गोवारीकर आणि आशुतोष गोवारीकर आहेत. सध्या चित्रपटातील कलाकारांची नावे गोपनीय ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे या चित्रपटात कोणते कलाकार झळकणार, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. ‘मान’ हा चित्रपट ४ जून २०२७ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.






