कंपनीतील 15 कोटींच्या ॲल्युमिनियमवर डल्ला; स्टोअर ऑफिसरसह 10 जणांवर गुन्हा दाखल
योगेश मकवाना (रा. संत तुकारामनगर, भोसरी), लहानू पुणेकर, दीपक कोळेकर (रा. पाईट), प्रमोद दत्तात्रय होले (रा. होलेवाडी), दीपेश तिवारी, अजय पाटोळे, विठ्ठल साळुंखे, जलालुद्दीन मोहम्मद, प्रदीप पटवा आणि वसीम शेख अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. नितीन आनंदा सावंत (३९, रा. शिरोली, ता. खेड) यांनी याप्रकरणी सोमवारी (दि.१६) उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वासुली येथील ॲडव्हिक ग्रुप ऑफ कंपनीजच्या ॲडव्हिक हायटेक प्रा. लि. आणि ॲडव्हिक ऑटो कॉम्प प्रा. लि. या कंपन्यांच्या विविध प्लांटमधील स्टोअरमध्ये ॲल्युमिनियमचे साहित्य ठेवण्यात आले होते. उत्पादनासाठी आवश्यक असलेले चांगले साहित्य, भंगार तसेच पुनर्निर्मितीसाठीचे साहित्य यांचा त्यात समावेश होता. कंपनीत स्टोअर ऑफिसर म्हणून कार्यरत असलेले योगेश मकवाना आणि लहानू पुणेकर यांनी त्यांच्या मदतीला असलेले कंत्राटी कामगार दीपक कोळेकर व प्रमोद होले तसेच कंपनीच्या व्हेंडर संस्थेचे प्रतिनिधी दीपेश तिवारी यांच्याशी संगनमत केल्याचा आरोप आहे.
ॲल्युमिनियम साहित्याचा अपहार
कंपनीने विश्वासाने ताब्यात दिलेले ॲल्युमिनियम साहित्य त्यांनी अपहार केला. या प्रकारामुळे कंपनीचे १५ कोटी ४० लाख ९२ हजार ८७६ रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
वाहतूकदारांच्या मदतीने साहित्य बाहेर
कंपनीतील साहित्य पुनर्निर्मितीसाठी वाहतूक वाहनांमधून पाठविले जात होते. त्याच प्रक्रियेत वाहतूकदार अजय पाटोळे आणि विठ्ठल साळुंखे यांच्या मदतीने साहित्य वाहनांमध्ये भरून बाहेर काढण्यात आल्याचा आरोप आहे.
१. कंपनीतील किती रुपयांच्या साहित्याचा अपहार झाला?
कंपनीतील तब्बल १५ कोटी ४० लाख ९२ हजार ८७६ रुपयांच्या साहित्याचा अपहार केल्याचा आरोप आहे.
२. कोणत्या साहित्याचा अपहार करण्यात आला?
उत्पादनासाठी आवश्यक ॲल्युमिनियम साहित्य, भंगार आणि पुनर्निर्मितीसाठी ठेवलेल्या साहित्याचा अपहार केल्याचे समोर आले आहे.
३. या प्रकरणात किती जणांवर गुन्हा दाखल झाला?
स्टोअर ऑफिसरसह एकूण १० संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






