(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Supriya Pilgaonkar: मराठी चित्रपटसृष्टीत आणखी एका नव्या चित्रपटाची भर पडणार आहे. प्रसिद्ध निर्मिती संस्था लव फिल्म्सने आपल्या दुसऱ्या मराठी चित्रपटाची घोषणा केली असून, ‘तू आहेस ना’ असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर आणि अभिनेता सिद्धार्थ बोडके प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत. नुकतेच चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करत निर्मात्यांनी ही घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, ५७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) गाला प्रीमियर विभागात जागतिक प्रीमियर होणारा हा एकमेव मराठी चित्रपट ठरणार आहे.
‘तू आहेस ना’ या चित्रपटातून माणसांमधील नातेसंबंध आणि दोन आयुष्यांना अनपेक्षितपणे जोडणाऱ्या एका अनोख्या बंधाची हृदयस्पर्शी कथा पाहायला मिळणार आहे. हा बंध दोन व्यक्तींचे आयुष्य त्यांच्या कल्पनेपलीकडे जाऊन कसे बदलतो, याची गोष्ट चित्रपटातून उलगडणार आहे.
या चित्रपटात सुप्रिया पिळगावकर मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहेत. मराठी आणि हिंदी चित्रपट, टेलिव्हिजन तसेच रंगभूमीवर अनेक दशकांपासून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या सुप्रिया यांना चित्रपटाची भावनिक कथा विशेष भावली. त्यामुळेच त्यांनी या प्रकल्पाचा भाग होण्याचा निर्णय घेतला. तर सिद्धार्थ बोडके यांचा लव फिल्म्ससोबतचा हा दुसरा चित्रपट आहे. यापूर्वी त्यांनी ‘देवमाणूस’ या चित्रपटात काम केले होते.
इफ्फीमध्ये होणार चित्रपटाचा जागतिक प्रीमियर
‘तू आहेस ना’ चित्रपटासाठी इफ्फी हा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. गोव्यात होणाऱ्या ५७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात २६ नोव्हेंबर रोजी गाला प्रीमियर विभागात या चित्रपटाचा जागतिक प्रीमियर होणार आहे. या विभागात प्रदर्शित होणारा हा एकमेव मराठी चित्रपट आहे.
या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन दिपक गावडे यांनी केले आहे. त्यांच्या यापूर्वीच्या कामाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार तसेच महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये गौरवण्यात आले आहे.
सुप्रिया पिळगावकर आणि सिद्धार्थ बोडके काय म्हणाले?
चित्रपटाविषयी बोलताना सुप्रिया पिळगावकर म्हणाल्या, “आजच्या काळात ‘तू आहेस ना’ या चित्रपटाचा विषय आणि त्याचे महत्त्व मला अभिनेत्री म्हणून विशेष भावले. चित्रपटात या विषयाची केलेली मांडणी आणि मी साकारणारी व्यक्तिरेखा यामुळे मी या चित्रपटाशी जोडले जाण्याचा निर्णय घेतला. प्रेक्षकांनी हा चित्रपट इफ्फीमध्ये पाहावा, याची मी आतुरतेने वाट पाहत आहे.”
तर सिद्धार्थ बोडके म्हणाले, “‘तू आहेस ना’ या चित्रपटाने मला भावनांचे विविध पैलू असलेली व्यक्तिरेखा साकारण्याचे आव्हान दिले. अभिनेता म्हणून मला अशा प्रकारची भूमिका साकारण्याची नेहमीच इच्छा होती. ‘देवमाणूस’नंतर लव फिल्म्ससोबतचा हा माझा दुसरा प्रकल्प आहे. एका वेगळ्या कथेसाठी आणि स्वतःमधील अभिनयाचा नवा पैलू शोधण्याची संधी देणाऱ्या या टीमसोबत पुन्हा काम करण्यासाठी मी उत्सुक होतो.”
दिग्दर्शक दिपक गावडे यांनीही या चित्रपटाबद्दल आनंद व्यक्त केला. मराठी चित्रपटसृष्टीत पुन्हा काम करण्याचा अनुभव समाधानकारक असल्याचे सांगत ‘तू आहेस ना’ ही कथा आपल्या मनाच्या जवळची असल्याचे त्यांनी म्हटले. प्रतिष्ठित इफ्फीमध्ये चित्रपटाचा जागतिक प्रीमियर होणार असल्याचा विशेष आनंद असल्याचेही त्यांनी सांगितले.
लव फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती लव रंजन आणि अंकुर गर्ग यांनी केली आहे. लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी दिपक गावडे यांनी सांभाळली आहे. ‘तू आहेस ना’ हा चित्रपट २०२७ मध्ये चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.






