
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Maitreya Teaser: काही नाती शब्दांत सांगणं कठीण असतं, तर काही नात्यांना नाव देणंही अवघड असतं. अशाच एका वेगळ्या नात्याची कथा मांडणाऱ्या आगामी ‘मैत्रेया’ या मराठी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. टीझरमध्ये समर, आयुषी, स्काय आणि रुची यांच्या आयुष्यातील मैत्री, जवळीक आणि त्यामागे दडलेल्या भावनांची झलक पाहायला मिळते. त्यामुळे या नात्यांमध्ये नेमकं काय दडलं आहे, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
‘मैत्रेया’च्या टीझरमध्ये आर्जोयी, जय, साजिरी आणि निर्वाण यांच्या नात्यांभोवती कथा फिरताना दिसते. चौघेही एकमेकांच्या आयुष्यातील खास व्यक्ती आहेत. त्यांच्यातील मैत्री, मस्ती आणि सहजपणा टीझरमध्ये पाहायला मिळतो.
मात्र, आयुष्यात एखादी नवीन व्यक्ती आली की नात्यांमध्ये बदल होऊ लागतात. आतापर्यंत आपली वाटणारी व्यक्ती अचानक परकी वाटू लागते. याच भावनेभोवती या चौघांच्या नात्यांचा गुंता उलगडताना दिसणार आहे.
टीझरमधील ‘एकीकडे प्रेम, एकीकडे मैत्री अन् एकीकडे मैत्रीत गोंधळलेलं प्रेम…’ हे वाक्य या नात्यांमधील संभ्रम आणखी वाढवतं. प्रेम आणि मैत्री यांच्यातील सीमारेषा नेमकी कुठे आहे, याचा शोध या चित्रपटातून घेतला जाणार आहे.
क्रांती रेडकर वानखेडे म्हणतात…
लेखिका-दिग्दर्शिका क्रांती रेडकर वानखेडे म्हणतात, “टीझरच्या शेवटी ‘एकीकडे प्रेम, एकीकडे मैत्री अन् एकीकडे मैत्रीत गोंधळलेलं प्रेम…’ हे वाक्य या नात्यांच्या गुंत्यात आणखी भर घालतं. या एका वाक्यातून आर्जोयी, जय, साजिरी आणि निर्वाण यांच्या नात्यांमधील पेच समोर येतो. प्रेम कुठे संपतं आणि मैत्री कुठून सुरू होते, की काही नाती या दोन्हींच्या मध्येच कायम राहातात, याचा शोध ‘मैत्रेया’च्या कथेतून घेतला जाणार आहे.”
तरुणाईच्या नात्यांची कथा
निर्माते मनोज खळतकर यांनी ‘मैत्रेया’बद्दल सांगितलं, “मला काहीतरी युथफुल करण्याची आणि संपूर्ण कुटुंबाला एकत्र बसून पाहता येईल असा फॅमिली एंटरटेनर प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याची इच्छा होती. ‘मैत्रेया’च्या माध्यमातून ही इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. तरुणाईच्या नात्यांमधील भावभावना, त्यातील गंमत आणि सहजपणा यांचा अनुभव प्रेक्षकांना या चित्रपटातून घेता येईल.”
समर टाईम्स प्रॉडक्शन निर्मित ‘मैत्रेया’चं लेखन आणि दिग्दर्शन क्रांती रेडकर वानखेडे यांनी केलं आहे. मनोज खळतकर हे चित्रपटाचे निर्माते असून अमन खळतकर सहनिर्माते आहेत.
चित्रपटात समर, आयुषी, स्काय आणि रुची यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मैत्री, प्रेम आणि नात्यांमधील बदलत्या भावनांची ही कथा २३ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.