(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Samay Raina: कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी कोणत्याही वादग्रस्त वक्तव्यामुळे किंवा शोमधील जुन्या व्हिडीओमुळे नव्हे, तर त्याच्या लग्नाच्या चर्चांमुळे तो चर्चेत आहे. अभिनेत्री मेधा शंकरसोबत समय रैना डिसेंबर २०२६ मध्ये लग्न करणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. आता खुद्द समयने या चर्चांवर प्रतिक्रिया देत अफवांना उत्तर दिलं आहे.
समय रैना आणि मेधा शंकर यांच्या लग्नाच्या अफवांना काही दिवसांपूर्वी रेडिटवरील एका निनावी पोस्टमुळे सुरुवात झाली. या पोस्टमध्ये एका युझरने स्वतःची ओळख समयच्या कुटुंबाच्या जवळची व्यक्ती म्हणून करून दिली होती. समयच्या आईशी बोलल्यानंतर आपल्याला त्याच्या आणि मेधाच्या लग्नाबद्दल माहिती मिळाल्याचा दावा या व्यक्तीने केला होता.
समय आणि मेधा डिसेंबर २०२६ मध्ये लग्न करणार असल्याचाही दावा या पोस्टमध्ये करण्यात आला होता. दोघे सध्या एकत्र सुट्टीवर असल्याचं तसेच लग्नाआधीच मुंबईत गुपचूप लग्न केल्याचंही या पोस्टमध्ये म्हटलं होतं. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्या नात्याची आणि लग्नाची चर्चा सुरू झाली.
या चर्चांदरम्यान समय रैनाने रविवारी त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली. त्यामध्ये ‘समय रैना डिसेंबरमध्ये मेधा शंकरशी लग्न करणार का?’ असा सवाल करण्यात आला होता.
समयने या पोस्टच्या पार्श्वभूमीवर ‘झूठ बोले कौवा काटे’ हे गाणं लावत या अफवांवर प्रतिक्रिया दिली. त्याने गंमतीने लिहिलं, “माझा डिसेंबरमध्ये भारत दौरा आहे @medhashankr, माफ कर, लग्न पुढे ढकलावे लागेल.”
समयच्या या पोस्टवरून त्याने लग्नाच्या चर्चांना नकार दिल्याचं स्पष्ट होतं.

(फोटो सौजन्य- समय रैना इन्स्टाग्राम)
मेधा शंकरनेही दिली प्रतिक्रिया
समयच्या या स्टोरीला मेधा शंकरनेही प्रतिक्रिया दिली आहे. तिने समयची इन्स्टाग्राम स्टोरी हसणाऱ्या इमोजीसह पुन्हा शेअर केली. त्यानंतर तिने आणखी एक मीम शेअर केला. त्याला तिने, ‘मी लग्नाच्या सर्व निराधार अफवा स्क्रोल करत असताना’ असं कॅप्शन दिलं.
त्यामुळे दोघांनीही सोशल मीडियावर सुरू असलेल्या लग्नाच्या चर्चांना मजेशीर अंदाजात उत्तर दिलं आहे.
मेधा शंकर नुकतीच समयच्या शोमध्ये दिसली होती
मेधा शंकर अलीकडेच समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट टॅलेंट सीझन २’ या शोमध्ये दिसली होती. या शोमध्ये ती वरुण धवन आणि शेरॉन वर्मासोबत पॅनेलिस्ट म्हणून सहभागी झाली होती. तिच्या या उपस्थितीनंतर समय आणि मेधा यांच्या डेटिंगच्या चर्चांनाही पुन्हा सुरुवात झाली.
मात्र, समय रैना किंवा मेधा शंकर यांच्यापैकी कोणीही त्यांच्या नात्याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. त्यामुळे सोशल मीडियावरील चर्चांपेक्षा दोघांच्या प्रतिक्रियाच सध्या समोर आहेत.
मेधा शंकरला विक्रांत मेस्सीसोबतच्या ‘१२th फेल’ या चित्रपटामुळे मोठी लोकप्रियता मिळाली. या चित्रपटातील भूमिकेमुळे ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आणि तिची मोठी चर्चा झाली.






