
फोटो सौजन्य - Social Media
प्रवीण तरडे यांनी मुलाखतीत सांगितले की, सुरुवातीला सिनेमाची कथा एका गरीब शेतकऱ्याभोवती फिरणार होती. याबाबत त्यांनी ज्येष्ठ अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्याशीही चर्चा केली होती. इतकेच नव्हे, तर या सिनेमात मुख्य भूमिकेत मकरंद अनासपुरे झळकणार होते. मात्र, जेव्हा प्रवीण यांच्या पत्नी स्नेहल यांना ही कथा समजली, तेव्हा त्यांनी कथेत काही महत्त्वाचे बदल सुचवले. महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे. मात्र, शेतकरी महिलांच्या आत्महत्यांविषयी फारसे ऐकायला मिळत नाही किंवा अशी उदाहरणे अत्यंत दुर्मिळ आहेत.
स्नेहल यांच्या मते, एखाद्या संकटाशी लढा देण्याऐवजी आपल्या मुलाबाळांना संकटात सोडून देणे हे एका आईला कधीच शक्य होत नाही. त्यामुळे त्यांनी प्रवीण यांना सिनेमा शेतकरी पुरुषाऐवजी शेतकरी महिलेवर आधारित ठेवण्याचा सल्ला दिला. प्रवीण यांनाही हा विचार पटला आणि त्यांनी मकरंद अनासपुरे यांच्याशी याबाबत चर्चा केली. त्याच काळात ‘झिम्मा’ आणि ‘बाईपण भारी देवा’ यांसारख्या स्त्रीप्रधान सिनेमांनी प्रेक्षकांची मने जिंकली होती. त्यामुळे प्रवीण यांनी स्नेहल यांच्या सूचनेनुसार कथेचे केंद्र शेतकरी पुरुषाऐवजी शेतकरी महिलेकडे वळवले.
या चर्चेदरम्यान स्नेहल यांनी प्रवीण यांना एक महत्त्वाची गोष्ट सांगितली होती. त्या म्हणाल्या होत्या, “आपल्या मुलांसाठी शेतकरी महिला कधीच आत्महत्या करत नाही. त्यामुळे देवाला जाब विचारण्याचा हक्कही त्या शेतकरी महिलेलाच आहे.”