
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
मराठी चित्रपटसृष्टीतील दमदार अभिनेत्री छाया कदम प्रत्येक भूमिकेत काहीतरी वेगळं करून दाखवण्यासाठी ओळखल्या जातात. मात्र, त्यांच्या आगामी ‘भूतम भयम्’ या हॉरर-कॉमेडी चित्रपटातील ‘जठाई’ ही व्यक्तिरेखा त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात वेगळ्या भूमिकांपैकी एक ठरणार आहे. नुकताच या रहस्यमय पात्राचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला असून, त्यातील छाया कदम यांचा भयावह अवतार पाहून चाहते अक्षरशः थक्क झाले आहेत.
प्रदर्शित करण्यात आलेल्या पोस्टरमध्ये ‘जठाई’चा भेदक चेहरा, विचित्र हावभाव आणि अंगावर काटा आणणारा लूक पाहायला मिळतो. विशेष म्हणजे, या मेकअपमध्ये छाया कदम यांना ओळखणंसुद्धा कठीण झालं आहे. सोशल मीडियावर या पोस्टरची जोरदार चर्चा सुरू असून, अनेकांनी त्यांच्या लूकचं कौतुक केलं आहे.
या भूमिकेसाठी छाया कदम यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. त्यांनी सांगितलं की, ‘जठाई’ ही व्यक्तिरेखा केवळ दिसण्यातच वेगळी नाही, तर तिची भाषा, चाल, बोलणं आणि देहबोलीही पूर्णपणे वेगळी आहे. चित्रपटात त्या गिब्रिश भाषेत संवाद बोलताना दिसणार आहेत. ही भाषा आत्मसात करणं त्यांच्यासाठी मोठं आव्हान ठरलं.
याशिवाय, या भूमिकेसाठी दररोज जवळपास साडेतीन तास प्रोस्थेटिक मेकअप करावा लागत होता आणि तो काढण्यासाठीही तितकाच वेळ लागत होता. जड मेकअप आणि वेशभूषेमुळे चित्रीकरणादरम्यान शारीरिक अडचणींचाही सामना करावा लागला. मात्र, पडद्यावर प्रभावी व्यक्तिरेखा उभी राहावी यासाठी संपूर्ण टीमने घेतलेली मेहनत त्यांना समाधान देणारी ठरली.
दिग्दर्शक रामचंद्र अरुण गांवकर यांच्या मते, ‘जठाई’ हे चित्रपटातील अत्यंत महत्त्वाचं पात्र असून, तिच्यामागे एक मोठं रहस्य दडलं आहे. त्यामुळे या व्यक्तिरेखेचा खरा उलगडा प्रेक्षकांना चित्रपटगृहातच अनुभवता येणार आहे.
झी स्टुडिओज प्रस्तुत आणि कायरा कुमार क्रिएशन्स निर्मित ‘भूतम भयम्’ या चित्रपटात करण सोनावणे, नील साळेकर, सौरभ घाडगे, शुभम जाधव, सिद्धांत सरफरे, मनमीत पेम, पुष्कराज चिरपुटकर यांच्यासह छाया कदम महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. हॉरर, कॉमेडी आणि रहस्य यांचा अनोखा संगम असलेला हा चित्रपट २४ जुलै रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.