(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
Vidyadhar Joshi: गेल्या काही वर्षांपासून गणेशोत्सवाच्या बदलत्या स्वरूपावर सातत्याने चर्चा होताना दिसत आहे. सार्वजनिक गणेश मंडळांच्या भल्या मोठ्या मूर्ती, विविध प्रकारच्या आकर्षक रचना, ध्वनी प्रदूषण आणि वाढत चाललेली इव्हेंटबाजी यामुळे गणेशोत्सवाच्या पारंपरिक स्वरूपाबाबत अनेकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. यंदाच्या गणेशोत्सवादरम्यान काही ठिकाणी गणेशमूर्ती कोसळण्याच्या घटनाही समोर आल्या. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सवातील बदलत्या पद्धतींवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.
सण-उत्सवांमध्ये वाढत चाललेलं ध्वनी प्रदूषण आणि इव्हेंटबाजी यामुळे सणांचं पावित्र्य कमी होत असल्याची खंतही अनेकांनी व्यक्त केली आहे. कलाविश्वातील अनेक कलाकारांनी यापूर्वी यावर भाष्य केलं आहे. आता मराठी सिनेविश्वातील ज्येष्ठ अभिनेते विद्याधर जोशी यांनीही गणेशोत्सवाच्या बदलत्या स्वरूपावर परखड मत व्यक्त केलं आहे.
नुकत्याच ‘आरपार’ला दिलेल्या मुलाखतीत विद्याधर जोशी यांनी गणेशोत्सवातील बदलांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी या बदलांवर चिंता व्यक्त करण्यासोबतच काही गोष्टींवर कडक शब्दांत टीकाही केली.
“खरं तर सण-उत्सवात जेव्हापासून स्पॉन्सरशिप सुरू झाली, विशेषत: राजकारण्यांनी प्रायोजकत्व द्यायला सुरुवात केली, तेव्हापासून गणेशोत्सवाची माती झाली आहे,” असं विद्याधर जोशी यांनी स्पष्टपणे म्हटलं.
‘आम्ही दोन, पाच, अकरा रुपयांपासून वर्गणी गोळा करायचो’
आपल्या लहानपणीच्या गणेशोत्सवाच्या आठवणी सांगताना विद्याधर जोशी यांनी पूर्वीची वर्गणी गोळा करण्याची पद्धतही सांगितली. “आम्ही लहान असताना दोन रुपये, पाच रुपये, अकरा रुपये किंवा पंचवीस रुपयांपासून घरोघरी जाऊन वर्गणी गोळा करायचो. उत्सव संपल्यानंतर ज्यांच्याकडून वर्गणी घेतली होती, त्यांच्याकडे जाऊन रीतसर छापील हिशोब द्यायचो,” असं त्यांनी सांगितलं.
गणेशोत्सवात व्यावसायिक प्रायोजकत्व आल्यानंतर उत्सवाच्या स्वरूपात मोठा बदल झाल्याचं विद्याधर जोशी यांनी म्हटलं. यावेळी त्यांनी राजकारण्यांकडून मिळणाऱ्या प्रायोजकत्वावरही नाराजी व्यक्त केली.
“गणपती चाळीत होता की मैदानावर, यापेक्षा विविध कंपन्यांकडून आणि सगळ्यात घाणेरडा प्रकार म्हणजे राजकारण्यांकडून मिळणाऱ्या स्पॉन्सरशिपला महत्त्व आलंय. राजकारण्यांचं हे प्रायोजकत्व सुरू झालं, तेव्हापासूनच गणेशोत्सवाची माती झाली,” अशा शब्दांत विद्याधर जोशी यांनी आपली नाराजी आणि राग व्यक्त केला.
गणेशोत्सवाच्या बदलत्या स्वरूपावर विद्याधर जोशी यांनी केलेलं हे परखड भाष्य सध्या चर्चेत आहे.






