
( फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
Natya Parishad Karandak 2026: मराठी रंगभूमीवरील हौशी आणि महाविद्यालयीन कलाकारांना व्यासपीठ मिळवून देणाऱ्या ‘नाट्य परिषद करंडक’ एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी नुकतीच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मध्यवर्ती मुंबई यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेत नाट्यांकुर, विक्रोळीच्या ‘पाकिस्तानचं यान’ या एकांकिकेने सर्वोत्कृष्ट पारितोषिक पटकावले. रेबन एंटरटेनमेंट, पुणे यांच्या ‘अपूर्णम’ या एकांकिकेला उत्कृष्ट, तर प्रेमराज सारडा महाविद्यालय, अहिल्यानगरच्या ‘बिन रंगाची गोष्ट’ या एकांकिकेला उत्तम पारितोषिक मिळाले.
शतकमहोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनानिमित्त सुरू झालेला ‘नाट्यकलेचा जागर’ हा उपक्रम दरवर्षी महाराष्ट्रभर विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून राबवला जातो. याच उपक्रमांतर्गत यंदा ‘नाट्य परिषद करंडक’ एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
प्राथमिक आणि अंतिम अशा दोन फेऱ्यांमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेची प्राथमिक फेरी ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रातील दहा केंद्रांवर आयोजित करण्यात आली होती. या फेरीतून निवड झालेल्या १७ एकांकिकांची अंतिम फेरी २७ आणि २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल, माटुंगा येथे पार पडली.
अमृता खानविलकर, सुनील बर्वे यांची उपस्थिती
२७ ऑक्टोबर रोजी अंतिम फेरीचे उद्घाटन स्पर्धेचे समन्वयक आणि नाट्य परिषदेचे कोषाध्यक्ष सतीश लोटके, परीक्षक दिलीप जाधव, चंद्रकांत कुलकर्णी, भारत गणेशपुरे, सुरेश जयराम, शिल्पा तुळसकर तसेच कार्यकारी समितीचे सदस्य शिवाजी शिंदे आणि विशाल शिंगाडे यांच्या हस्ते झाले. यावेळी अभिनेत्री अमृता खानविलकर, अभिनेते सुनील बर्वे, आशुतोष गोखले आणि अक्षर कोठारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
ज्येष्ठ कलाकारांकडून एकांकिकेतील कलावंतांना मार्गदर्शन
या स्पर्धेच्या निमित्ताने अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या एकांकिकांमधील कलाकारांसाठी त्यांच्या गावी जाऊन विशेष नाट्य कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळांमध्ये ज्येष्ठ दिग्दर्शक आणि कलाकार कुमार सोहोनी, देवेंद्र पेम, अमेय दक्षिणदास, संतोष पवार, विजय केंकरे, अद्वैत दादरकर, प्राजक्त देशमुख, विजू माने, डॉ. अनिल बांदिवडेकर आणि पंढरीनाथ कांबळे यांनी मार्गदर्शन केले.
अंतिम फेरीत विविध विषयांवर आधारित आणि नावीन्यपूर्ण मांडणी असलेल्या एकांकिका सादर करण्यात आल्या. या स्पर्धेच्या माध्यमातून नव्या कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळाली.
नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी यावेळी परिषदेच्या कार्याची भूमिका स्पष्ट केली. कलाकार शोधणे, त्यांना घडवणे आणि आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हे नाट्य परिषदेचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
हौशी आणि महाविद्यालयीन कलाकारांसाठी नाट्य परिषदेने हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. यामुळे रसिकांना नवनवीन कलाकृती पाहण्याची संधी मिळेल आणि भविष्यात व्यावसायिक रंगभूमीलाही सक्षम कलाकार मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण
२८ ऑक्टोबर रोजी झालेल्या पारितोषिक वितरण समारंभाला नाट्य परिषदेचे माजी पदाधिकारी गुरुनाथ दळवी, अभिनेते प्रदीप कबरे, शरद पोंक्षे, संजय देसाई, गीता सोमण, सुनील वणजू आणि जयंत जातेगावकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.
अंतिम फेरीचे परीक्षक म्हणून दिलीप जाधव, चंद्रकांत कुलकर्णी, भारत गणेशपुरे, सुरेश जयराम आणि शिल्पा तुळसकर यांनी काम पाहिले. स्पर्धेचे समन्वयक म्हणून सतीश लोटके यांनी जबाबदारी सांभाळली. पारितोषिक वितरण समारंभाचे सूत्रसंचालनही त्यांनी केले, तर नाट्य परिषदेचे सदस्य शिवाजी शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
‘नाट्य परिषद करंडक’ स्पर्धेच्या माध्यमातून नव्या पिढीतील कलाकारांना रंगभूमीवर स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळाली. या उपक्रमामुळे मराठी रंगभूमीवरील नव्या कलावंतांना प्रोत्साहन मिळण्यास मदत होणार आहे.