
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
Dhaktya Sunbai Marathi Serial: झी मराठी गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. आता या वाहिनीवर आणखी एका नव्या मालिकेची भर पडणार आहे. ‘धाकट्या सूनबाई’ ही नवीन मालिका २८ सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत अभिनेता मंदार जाधव आणि अभिनेत्री चिन्मयी मोरे यांची जोडी मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. यासोबतच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर नेहा कुलकर्णी, जी ‘नुसती उठाठेव’ या नावाने ओळखली जाते, तिचीही मालिकेत महत्त्वाची एन्ट्री होणार आहे.
झी मराठीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका प्रोमोमधून नेहा कुलकर्णीच्या एन्ट्रीची झलक पाहायला मिळाली. आतापर्यंत सोशल मीडियावर आपल्या कंटेंटमुळे लोकप्रिय झालेली नेहा आता ‘धाकट्या सूनबाई’च्या माध्यमातून पहिल्यांदाच छोट्या पडद्यावर दिसणार आहे.
या मालिकेत नेहा मुख्य अभिनेत्रीच्या धाकट्या बहिणीची भूमिका साकारणार आहे. तिच्या पात्राचं नाव ‘किमया’ आहे. त्यामुळे नेहाचा अभिनय आणि तिचं पात्र मालिकेत कसं रंगणार, याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना आहे.
दोन कुटुंबांभोवती फिरणार कथा
‘धाकट्या सूनबाई’ची कथा दोन कुटुंबांभोवती फिरते. त्यांच्या वेगवेगळ्या विचारसरणी, नाती आणि त्यातून निर्माण होणारी गुंतागुंत मालिकेत पाहायला मिळणार आहे. आपल्या माणसांची साथ आणि नात्यांमधील विश्वास आयुष्याला कसा अर्थ देतो, हे राधिका आणि वेदांत यांच्या आयुष्यातून उलगडणार आहे.
कृष्ण मंदिराच्या पायऱ्यांवर लहानपणी सापडलेली राधिका ही आप्पा आणि निर्मला यांची दत्तक मुलगी आहे. आप्पांनी तिला कृष्णाचा प्रसाद मानून आपल्या मुलीप्रमाणे वाढवलं आहे.
सालस, मनमिळाऊ आणि उत्साही असलेली राधिका कायम इतरांच्या मदतीसाठी पुढे असते. मात्र, घरातील गोदाक्का तिला आजही ‘परकी’ मानतात. त्यामुळे घरच्यांचं प्रेम मिळत असूनही राधिकाच्या मनात आपल्या खऱ्या घराचा आणि आपल्या माणसांचा शोध कायम आहे.
दुःखाच्या क्षणी राधिका कृष्णाशी मनमोकळेपणाने संवाद साधते आणि त्यालाच आपला सखा मानते. तिच्या आयुष्यातील हा शोध मालिकेच्या कथेला महत्त्वाचं वळण देणार आहे.
वेदांत आहे पटवर्धन कुटुंबाचा वारसदार
दुसरीकडे वेदांत हा पटवर्धन कुटुंबातील मुलगा असून ‘आराधना’ या पूजा साहित्य, अत्तर आणि अगरबत्तीच्या व्यवसायाचा वारसदार आहे. हुशार, सुसंस्कृत आणि जबाबदार असलेला वेदांत कुटुंबाच्या परंपरांना महत्त्व देतो.
आई दमयंतीच्या शिस्तीत आणि विचारांमध्ये वाढलेल्या वेदांतच्या आयुष्यात राधिकेची भेट नवा प्रश्न घेऊन येते. माणसाची ओळख त्याच्या रक्ताने आणि कुळाने ठरते की त्याच्या मनाने? राधिकेमुळे वेदांतला स्वतःच्या विचारांकडे नव्या नजरेने पाहण्याचा प्रवास सुरू होतो.
आता राधिका आणि वेदांतच्या आयुष्यात कोणती वळणं येणार, त्यांच्या नात्यामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये काय बदल घडणार आणि किमयाची भूमिका या कथेत कोणतं नवं वळण आणणार, हे मालिकेच्या आगामी भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.‘धाकट्या सूनबाई’ २८ सप्टेंबरपासून झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.