(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Harshad Atkari: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता हर्षद अतकरी लवकरच एका नव्या आणि हटके भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जवळपास दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर हर्षद पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर कमबॅक करत आहे. झी मराठीच्या आगामी ‘येतेच आता मी नांदायला’ या मालिकेत तो ‘अभिजीत थोरात’ ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. विशेष म्हणजे, या भूमिकेसाठी त्याला सातारी भाषा, रांगडा स्वॅग आणि गावाकडचा बिनधास्त अंदाज आत्मसात करावा लागला आहे. या नव्या भूमिकेच्या निमित्ताने हर्षदने शूटिंगदरम्यानचे अनेक मजेशीर अनुभव सांगितले आहेत.
आपल्या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना हर्षद अतकरी म्हणाला, “माझ्या व्यक्तिरेखेचं नाव अभिजीत थोरात आहे. हा साताऱ्यात लहानाचा मोठा झालेला मुलगा आहे. अत्यंत बिनधास्त, बेफिकीर, कोणालाही न जुमानणारा, हुशार आणि कोणतंही काम करून देणारा असा त्याचा स्वभाव आहे. त्याचं आईवर प्रचंड प्रेम आहे. झी मराठीसोबत काम करण्याची इच्छा अनेक वर्षांपासून होती. अनेक शोसाठी बोलणी झाली, पण काही कारणांमुळे काम होऊ शकलं नाही. मात्र, या मालिकेसाठी जेव्हा कॉल आला, तेव्हा मी एका फोनमध्येच होकार दिला. इतकं उत्तम पात्र साकारण्याची संधी मिळणं हे माझ्यासाठी नशीबच आहे.”
सातारी भाषा, रांगडा स्वॅग आत्मसात करण्यासाठी घेतली मेहनत
या भूमिकेच्या तयारीबद्दल सांगताना हर्षद म्हणाला, “सर्वात आधी मी सातारी भाषा, तिचा लहेजा आणि बोलण्याची ढब शिकण्यावर लक्ष दिलं. सध्या मालिकेचं शूटिंगसुद्धा साताऱ्यात सुरू असल्यामुळे तिथल्या लोकांचं निरीक्षण करतोय. त्याचा या व्यक्तिरेखेसाठी नक्कीच फायदा होत आहे. याआधी गावाकडच्या भूमिका केल्या असल्या, तरी गावचा रांगडेपणा आणि वेगळा स्वॅग असलेली भूमिका पहिल्यांदाच साकारतोय. या पात्राच्या अनेक वेगवेगळ्या छटा आहेत. खरं सांगायचं तर मी अशाच एका भूमिकेसाठी इतकी वर्षं वाट पाहत होतो.”
JCB वर तब्बल दीड तास केला डान्स!
या मालिकेच्या प्रोमो शूटिंगचाही हर्षदसाठी एक वेगळाच अनुभव ठरला. प्रोमोमध्ये अभिजीत थोरातची एन्ट्री चक्क JCB वर डान्स करताना दाखवण्यात आली आहे. या भन्नाट सीनबद्दल हर्षदने सांगितलं, “याआधी मी अशा प्रकारची भूमिका कधीच केली नव्हती. त्यात प्रोमोचं शूटिंगही मोठ्या स्तरावर करण्यात आलं. त्यामुळे हा माझ्यासाठी पहिलाच अनुभव होता. प्रोमोमध्ये माझ्या व्यक्तिरेखेची एन्ट्री JCB वर डान्स करताना दाखवली आहे. त्यासाठी मी जवळपास दीड तास JCB वर मनसोक्त नाचत होतो. हे शूट करताना मला खूप मजा आली.”
जवळपास दोन वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करताना हर्षदच्या मनात सुरुवातीला थोडी धाकधूक होती. प्रेक्षक आपल्याला या नव्या भूमिकेत स्वीकारतील का, असा प्रश्न त्याला पडला होता. मात्र, मालिकेच्या प्रोमोला मिळालेला प्रतिसाद पाहून त्याचा आनंद द्विगुणित झाला आहे. आतापर्यंत केलेल्या मालिकांपैकी या प्रोमोला आणि त्याच्या व्यक्तिरेखेला सर्वाधिक चांगला प्रतिसाद मिळत असल्याचंही त्याने सांगितलं.
आता हर्षद अतकरीचा हा नवा रांगडा अंदाज प्रेक्षकांना किती आवडतो, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. ‘येतेच आता मी नांदायला’ ही मालिका ३० नोव्हेंबरपासून सोमवार ते शुक्रवार रात्री १० वाजता फक्त झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.






