
( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)
Premala Conditions Apply: Zee 5 वरील ‘प्रेमाला कंडिशन्स अप्लाय’ ही मालिका सध्या आधुनिक नातेसंबंध, कॉर्पोरेट जीवनशैली आणि आजच्या पिढीच्या अपेक्षांची रंजक मांडणी करत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. मालिकेत आता एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. ऑफिसची बॉस ‘मीरा’ प्रसूती रजेवर (मॅटर्निटी लीव्ह) जात असून तिच्या जागी ‘गौतम’ची नवी एन्ट्री होत आहे. या बदलाच्या पार्श्वभूमीवर मीरा आणि गौतम यांनी आपल्या भूमिका, ऑफिसचे वातावरण आणि आजच्या पिढीतील नात्यांवर ‘नवराष्ट्र’शी मनमोकळा आणि Exclusive संवाद साधला.
प्रसूती रजेवर जाण्याविषयी बोलताना मीराने स्पष्ट केले की, ती फक्त काही काळासाठी रजेवर जात असून नोकरी सोडत नाही. शहरी भागातील महिलांसाठी मातृत्व आणि करिअर या दोन्ही गोष्टी समान महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे प्रसूती रजेनंतर ती पुन्हा कामावर रुजू होणार आहे.
बॉस म्हणून स्वतःच्या स्वभावाबद्दल सांगताना ती म्हणाली की, ती कामाच्या ठिकाणी कडक असली तरी सहकाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील आहे. ऋषी आणि अनन्या या ज्युनिअर्सनी आपली नोकरी गमावू नये आणि त्यांची काळजी घेतली जावी, म्हणूनच ती शिस्त पाळते. तिच्या मनात कोणताही छुपा हेतू नसून ती केवळ कामाला प्राधान्य देते. ओटीटी आणि आधुनिक वातावरणामुळे घर आणि नोकरीचा समतोल साधणे सोपे झाले आहे.
मीरा रजेवर गेल्यानंतर गौतम या नव्या पात्राचा शोमध्ये प्रवेश होतो. या भूमिकेबद्दल गौतमने सांगितले की, ट्रेलर पाहिल्यानंतर आणि टीमशी चर्चा केल्यानंतर त्याला या मालिकेचा भाग होण्याची इच्छा झाली.
गौतम ही एक अत्यंत परफेक्शनिस्ट आणि शिस्तबद्ध व्यक्तिरेखा आहे. कपड्यांची घडी असो किंवा बोलण्याची पद्धत, गौतम प्रत्येक गोष्टीत परफेक्ट. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, स्वतःची चूक कधीच मान्य न करणारा आणि कधीही ‘सॉरी’ न म्हणणारा असा त्याचा स्वभाव आहे. तो ऑफिसमधील सहकाऱ्यांना बदलण्यासाठी आणि त्यांची जागा दाखवण्यासाठी आला आहे, स्वतः बदलण्यासाठी नाही.
ऑफिसमधील ‘नो डेटिंग’ नियमांबद्दल गौतमने आपले मत मांडले. ऑफिसमध्ये शिस्त राखण्यासाठी नियम बनवले जातात; परंतु माणसांमधील आकर्षण आणि प्रेम नियमांनी रोखता येत नाही. ५० वर्षांपूर्वी लोक प्रेमासाठी नियम मोडायचे आणि आजही मोडावे लागतात. काळ बदलला तरी प्रेम, सहचर्य आणि नात्यांमधील मूळ मानवी भावना तीच राहते, असे त्याने स्पष्ट केले.