(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
गुढी पाडवा हा महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा होणारा मराठी नववर्षाचा सण आहे. घराघरांत गुढी उभारली जाते, पारंपरिक पदार्थांचा आस्वाद घेतला जातो आणि रंगीबेरंगी शोभायात्रांमध्ये लोक सहभागी होऊन आनंद साजरा करतात. यंदा झी मराठीवरील कलाकारही या सणाला खास पद्धतीने सामील होत आहेत
वल्लरी विराज (श्रावणी), शुभ श्रावणी
“गुढी पाडव्याला मी डोंबिवलीच्या शोभायात्रेत ‘शुभ श्रावणी’च्या सहकलाकारांसोबत सहभागी होणार आहे. प्रेक्षकांना भेटण्याची ही संधी खूप खास आहे आणि नववर्ष त्यांच्यासोबत साजरे करण्याचा अनुभव खूप सुखद आहे. शोभायात्रेत लोकांचा उत्साह पाहण्यासारखा आणि अनुभवण्यासारखा असतो. मी छान पारंपरिक वेशभूषेत या शोभायात्रेत जाणार आहे. घरीही गुढी पाडवा तितक्याच उत्साहाने साजरा केला जातो; आम्ही एकत्र गुढी उभारतो आणि आई मस्त बासुंदी‑पुरीचे जेवण बनवते.”
Nora Fatehi आणखी अडचणीत! ‘अश्लीलतेच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्या..’ म्हणत कंगना रणौतचा बॉलीवूडवर हल्लाबोल
विजया बाबर (कमळी), कमळी:
विजया बाबर (कमळी) म्हणाली, “यावर्षी मी डोंबिवलीच्या शोभायात्रेत सहभागी होणार आहे, आणि नंतर दरवर्षीप्रमाणे गावातील ग्रामदेवता जानुबाईची जत्रा साजरी करण्यासाठी जातील. यावर्षी एक खास गोष्ट म्हणजे, मागच्या वर्षी जत्रेसाठी गावी गेल्यावर त्याच दिवशी मला ‘कमळी’साठी कॉल आला होता; तेव्हा मी मनात इच्छा व्यक्त केली होती की हे काम मिळावे, आणि आता ते पूर्ण झाले असल्याने मी यावेळी आभारी आहे. आमच्याकडे आजी गुढी उभारते, आणि मी सातारची असल्यामुळे घरी पुरणपोळी, गुळवणी आणि कटाची आमटी असते. मला ढोल‑ताशा पथक खूप आवडते आणि शोभायात्रेबद्दल खूप उत्सुकता आहे. सर्व प्रेक्षकांना मी गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देते.”
‘त्या दिवशी भूतांवर बसला विश्वास…’ अक्षय कुमारचा थरारक अनुभव; घरात फिरायची स्त्रीची आत्मा, मुलानेही साधला संवाद
मेघना एरंडे (पमा परब), सनई चौघडे:
“मी दरवर्षी घरीच गुढी पाडवा साजरा करत होते, पण यावर्षी मी झी मराठी आणि ‘सनई चौघडे’च्या कुटुंबासोबत हा सण साजरा करणार आहे. आम्ही सर्व एकत्र डोंबिवली शोभायात्रेत सहभागी होणार आहोत. आमची मालिका गुढी पाडव्याच्या आठवड्यात सुरू झाली आहे, त्यामुळे प्रेक्षकांसोबत हे नवीन वर्ष साजरे करण्याचा उत्साह दुप्पट आहे. या नववर्षाचा माझा संकल्प म्हणजे आमच्या नवीन मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांचे मनोरंजन करणे आणि त्यांचे प्रेम मिळवणे. आमच्या घरी मी आणि माझ्या सासूबाई पहाटे उठून गुढी उभारतो. आमच्याकडे बायकांचेच राज्य असल्यामुळे गुढीसाठी कोणता शेंडा आणि कोणती साडी लावायची हे आम्ही ठरवतो. आमच्याकडे एक खास काठी आहे जी फक्त गुढी उभारण्यासाठीच वापरली जाते. आमच्या बाल्कनीत बरीच जागा आहे जिथे आम्ही गुढी उभारून पूजा करतो. त्या दिवशी सुग्रास जेवण असते. यावर्षी मी पहिल्यांदाच शोभायात्रेत सहभागी होणार आहे. त्यानंतर ‘सनई चौघडे’च्या टीमसोबत दुपारचे जेवण करणार आहे. माझ्यासाठी हे नववर्ष एका नव्या पर्वाची सुरुवात आहे. तुम्हा सर्वांना हे नवीन वर्ष सुख, समृद्धी, भरभराट, शांतता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे उत्तम आरोग्य घेऊन येवो, ही सदिच्छा.”
जुई गोगरी (आसावरी), सनई चौघडे :
“सर्वांना माझ्याकडून नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. यावर्षीपासून आम्ही घरी गुढी उभारणार आहोत. मी दरवर्षी गिरगावच्या शोभायात्रेत जाते आणि मला ती खूप आवडते, कारण तिथे आपली माणसं एकत्र आली आहेत असे वाटते. गुढी पाडवा म्हटलं की गोड जेवण असायलाच पाहिजे, गुळपोळी, श्रीखंड-पूरी, बटाट्याची भाजी, वरण-भात, भाजी, कोशिंबीर, पापड, लोणचं असा एक छान बेत असतो. दरवर्षी मी देवळात जाऊन बाप्पाचा आशीर्वादही घेते.”
जसे हे कलाकार त्यांच्या खासगी आयुष्यात गुढी पाडवा साजरा करतात, तसेच झी मराठीवरील लोकप्रिय मालिकांमध्येही सणाचा उत्साह पाहायला मिळणार आहे. ‘तुला जपणार आहे’ मालिकेत मीरा आणि अथर्व संपूर्ण कुटुंबासोबत गुढी उभारणार आहेत. ‘वीण दोघातली ही तुटेना’ मालिकेत समर–स्वानंदी आणि रोहन–अधिराच्या कुटुंबाने आणि ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत सिद्धू–भावनाच्या कुटुंबाने त्यांच्या पहिल्या गुढी पाडव्यासाठी खास तयारी केली असून हा अनुभवही कलाकारांसाठी खास ठरणार आहे.






