
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Sanai Chaughade Serial: गणेशोत्सवाला आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रभर गणरायाच्या आगमनाची लगबग सुरू झाली असून सर्वत्र उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. गणपती म्हटलं की कोकणातील गणेशोत्सवाला एक वेगळंच महत्त्व आहे. घराघरात बाप्पाचं स्वागत, पारंपरिक पूजा-अर्चा, आरती, भजन आणि गावच्या वातावरणात साजरा होणारा उत्सव हे कोकणच्या गणेशोत्सवाचं खास वैशिष्ट्य आहे. याच पारंपरिक गणेशोत्सवाची झलक आता झी मराठीच्या ‘सनई चौघडे’ या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
मालिकेतील ‘परब’ कुटुंब यंदाचा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गावी जाणार आहे. या निमित्ताने मालिकेत कोकणातील पारंपरिक गणेशोत्सवाचे अनेक रंग पाहायला मिळणार आहेत. हरतालिकेचं पूजन, कार्यशाळेतून गणपतीचं आगमन, चार मुलींच्या हातून बाप्पाचं स्वागत, गावातील आरती, डबल बारी भजन, गौरीचं आगमन आणि पारंपरिक पद्धतीने होणारं गणपती विसर्जन असे विविध प्रसंग या विशेष ट्रॅकमध्ये दाखवण्यात येणार आहेत.
या गणेशोत्सवाच्या शूटिंगचा अनुभव सांगताना शर्वरीची भूमिका साकारणारी अभिनेत्री चिन्मयी साळवीने आपला अनुभव शेअर केला. ती म्हणाली, “माझ्यासाठी हा अनुभव खूपच खास आहे. मी पहिल्यांदाच कणकवलीला गेले होते आणि मला माझ्याच गावी आल्यासारखं वाटलं. माझं गाव संगमेश्वर असल्यामुळे इथला दरवळ, शेणी-चुलीचा वास आणि गावचं वातावरण खूप आपलंसं वाटलं.”
“शूटिंगचं काम खूप होतं, पण अजिबात स्ट्रेस किंवा हेक्टिक वाटलं नाही. गणपतीच्या सुट्टीला गावी आल्यासारखं वाटलं. खूप मजा-मस्ती करत आम्ही शूटिंग एन्जॉय केलं. सध्या आम्ही परब कुटुंबाच्या गावच्या घरी आलोय. गणपतीसाठी सुट्टीचा अर्ज घेऊन चाकरमणी जसे गावी जातात, अगदी तसेच आम्ही सगळे गावी आलोय,” असंही चिन्मयीने सांगितलं.
परब आणि खानोलकर कुटुंबात पुढे काय घडणार?
या विशेष ट्रॅकमध्ये खानोलकर कुटुंबातील काही सदस्यही सहभागी होणार असल्याचं चिन्मयीने सांगितलं. त्यामुळे पुढे मालिकेत काही रंजक घडामोडी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत अधिक माहिती देण्यास तिने नकार दिला.
चिन्मयी म्हणाली, “यामध्ये खानोलकर कुटुंबातलेसुद्धा काही मेंबर्स आहेत, त्यामुळे पुढे खूप इंटरेस्टिंग गोष्टी पाहायला मिळणार आहेत. त्याबद्दल जास्त रिव्हील करू शकत नाही. पण प्रेक्षकांना हा ट्रॅक नक्कीच खूप आवडेल.”
कोकणच्या पावसात शूटिंगचं आव्हान
कोकणातील शूटिंगचा अनुभव सांगताना चिन्मयीने तिथल्या पावसामुळे आलेल्या अडचणींचाही उल्लेख केला. “कोकणातला पाऊस म्हणजे कधीही सुरू होतो आणि कधीही थांबतो. त्यामुळे आमचं शूटिंग थोडं हवामानावर अवलंबून होतं. टीम खूप चांगल्या पद्धतीने प्लॅनिंग करत होती. पाऊस आला तर त्यानुसार सिक्वेन्स किंवा लोकेशन बदलून शूटिंग मॅनेज केलं,” असं तिने सांगितलं.
आउटडोअर शूट असल्यामुळे दिवस मोठा असायचा. साधारण १२ ते १५ तास काम करावं लागायचं आणि काही वेळा त्यापेक्षाही जास्त वेळ शूटिंग सुरू असायचं. पावसामुळे लोकेशनवर पोहोचण्यापासून ते कंटिन्युइटी मेंटेन करण्यापर्यंत अनेक अडचणी येत होत्या. अचानक पाऊस सुरू झाल्यास टेक थांबवावा लागत होता. मात्र, संपूर्ण टीमच्या सहकार्यामुळे या अडचणी सहज पार पडल्याचं चिन्मयीने सांगितलं.
पहाटे पाच वाजेपर्यंत रंगली धमाल
शूटिंगच्या व्यस्त वेळापत्रकामुळे फिरण्यासाठी फारसा वेळ मिळाला नाही, मात्र कामाच्या मधून कलाकारांनी भरपूर एन्जॉय केलं. विशेष म्हणजे शूटिंगच्या शेवटच्या दिवशी बीचवर शूटिंग करताना संपूर्ण टीमने खूप धमाल केली.
“तिथलं जेवण इतकं भारी होतं आणि भजन, आरती, डबल बारी ठेवली होती. त्यात तर पूर्ण युनिटने खूप एन्जॉय केलं. आम्ही अक्षरशः पहाटे पाच वाजेपर्यंत नाचलो आणि दुसऱ्या दिवशी साडेआठचा कॉल टाइम असूनही सगळे फुल एनर्जीमध्ये होते,” असा मजेशीर किस्साही चिन्मयीने सांगितला.
प्रेक्षकांना अनुभवता येणार कोकणचा उत्साह
कोकणचं निसर्गरम्य वातावरण, गावाकडची माणसं, पारंपरिक पद्धतीने साजरा होणारा गणेशोत्सव आणि त्यातील उत्साह यामुळे ‘सनई चौघडे’मधील हा गणेशोत्सवाचा ट्रॅक खास ठरणार आहे. परब आणि खानोलकर कुटुंबाच्या गावच्या मुक्कामात नेमकं काय घडणार, हे पाहणं आता प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचं ठरणार आहे.