
फोटो सौजन्य- pinterest
यंदा हरतालिका आणि गणेश चतुर्थी सोमवार, १४ सप्टेंबर रोजी एकाच दिवशी येत आहे. हा दुर्मिळ योग 31 वर्षांनंतर येत आहे, असे ज्योतिषांचे म्हणणे आहे. मात्र एकाच दिवशी हरतालिका आणि गणेश चतुर्थी येत असल्याने हरतालिकेचा उपवास आणि पूजा नेमकी कधी करावी असा अनेक महिलांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.
हरतालिका आणि गणेश चतुर्थी हे दोन्ही सण हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचे सण आहेत. हरतालिकेच्या दिवशी महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास ठेवतात आणि कुमारिका चांगला वर मिळावा म्हणून हरतालिकेचा उपवास करतात, तर गणेश चतुर्थीच्या दिवशी घराघरांमध्ये गणपती बाप्पांचे आगमन होते. सामान्यतः गणेश चतुर्थी ही हरतालिकेच्या दुसऱ्या दिवशी येते परंतु यावेळी दोन्ही सण एकाच दिवशी येत आहे.
यंदा हरतालिका आणि गणेश चतुर्थी 14 सप्टेंबर रोजी साजरे केले जाणार आहे. यावेळी तृतीया तिथी 14 सप्टेंबर रोजी सकाळी 7.6 वाजेपर्यंत असेल त्यानंतर चतुर्थी तिथीची सुरुवात होणार आहे. सूर्योद्याच्या वेळी तृतीया तिथी असल्याने 14 सप्टेंबरलाच हरतालिकेचा उपवास करावा. तसेच 14 सप्टेंबर रोजी सकाळी चतुर्थी तिथीची सुरुवात होत असल्याने याच दिवशी गणेश चतुर्थीचा सण साजरा केला जाईल.
महाराष्ट्रातील पंचांगानुसार हरतालिका तृतीया १४ सप्टेंबर रोजी आहे. तृतीया तिथी १३ सप्टेंबर रोजी सकाळी ७:०८ वाजता सुरू होऊन १४ सप्टेंबर रोजी सकाळी ७:०६ वाजता समाप्त होते. मुंबईसाठी हरतालिका पूजेचा प्रातःकालीन मुहूर्त साधारण सकाळी ६:२६ ते ७:०६ असा दिला आहे. हरतालिकेचे व्रत करणाऱ्या महिलांनी १४ सप्टेंबर रोजी उपवास करावा, अशी महाराष्ट्रातील पंचांगपरंपरेनुसार माहिती आहे. सकाळी स्नान करून हरतालिकेचा संकल्प करावा आणि भगवान शिव-पार्वतीची पूजा करावी. हरतालिकेचे व्रत हे श्रद्धेनुसार निर्जल किंवा फलाहार पद्धतीने केले जाते.
दोन्ही सण एकाच दिवशी असल्याने सकाळी हरतालिकेची पूजा प्रथम करणे योग्य मानले जाते. त्यानंतर गणेश चतुर्थीची पूजा आणि गणपतीची स्थापना करता येते. गणेश चतुर्थीची पूजा साधारण दुपारच्या पूर्वार्धातील शुभ मुहूर्तात केली जाते. यावर्षी गणेश चतुर्थीची पूजा १४ सप्टेंबरलाच होणार आहे.
यंदा हरतालिका व्रत आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी असल्यामुळे हरतालिकेचा उपवास त्याच दिवशी सोडण्याऐवजी मंगळवार, १५ सप्टेंबर रोजी सकाळी हरतालिकेची उत्तरपूजा केल्यानंतर पारणे करण्याची परंपरा सांगितली जात आहे. उत्तरपूजा झाल्यानंतर देवीला नैवेद्य दाखवून पाणी किंवा तीर्थ घेऊन उपवास सोडावा. त्यानंतर हलका सात्त्विक आहार घ्यावा.
निर्जल उपवास केल्यास अचानक जड अन्न घेऊ नये. प्रथम पाणी किंवा तीर्थ घ्यावे. त्यानंतर दूध, फळे, खीर किंवा हलका उपवासाचा आहार घ्यावा. आरोग्याच्या कारणास्तव निर्जल उपवास करणे शक्य नसल्यास आपल्या प्रकृतीनुसार उपवासाची पद्धत ठरवावी.
हरतालिका व्रतामध्ये भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. सौभाग्य, पतीचे दीर्घायुष्य, वैवाहिक सुख आणि कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी महिला श्रद्धेने हे व्रत करतात. माता पार्वतीने भगवान शिवांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली, अशी धार्मिक श्रद्धा आहे. त्यामुळे त्यांच्या अखंड सौभाग्याचे प्रतीक म्हणून हरतालिका व्रताला विशेष महत्त्व दिले जाते.
या दिवशी शिव-पार्वतीची पूजा करून मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना केली जाते. तसेच अविवाहित मुलीही मनासारखा जीवनसाथी मिळावा, या इच्छेने हरतालिकेचे व्रत करतात. प्रदेश आणि कुटुंबाच्या परंपरेनुसार पूजा-विधीमध्ये काही फरक असू शकतो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)