
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Sun Marathi Serial:‘सन मराठी’वरील लोकप्रिय मालिका ‘मी संसार माझा रेखिते’ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मालिकेतील अनुप्रिया प्रत्येक संकटावर मात करत स्वतःचं अस्तित्व निर्माण करताना दिसत आहे. तिच्या या प्रवासातून महिलांना नवी प्रेरणा मिळत आहे. मालिकेत नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत असतानाच आता एका नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे. अभिनेता निरंजन कुलकर्णी महत्त्वपूर्ण भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
निरंजन कुलकर्णी ‘मी संसार माझा रेखिते’मध्ये एका यशस्वी बॅडमिंटन कोचची भूमिका साकारणार आहे. त्याची स्वतःची बॅडमिंटन अकॅडमी असून या अकॅडमीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात. बाहेरून पाहताना या पात्राची एक वेगळीच प्रतिमा दिसते. मात्र, त्याच्या व्यक्तिमत्त्वाची आणखी एक बाजू असून त्यामागे एक रहस्य दडलेलं आहे.
या पात्राची ही दुसरी बाजू नेमकी काय आहे आणि त्याच्या आयुष्यात असं काय घडलं आहे, हे मालिकेच्या आगामी भागांत उलगडणार आहे.
निरंजन कुलकर्णीने आपल्या भूमिकेबद्दल सांगताना म्हटलं, “सन मराठीवरील ही माझी पहिलीच मालिका आहे. त्यात ‘मी संसार माझा रेखिते’ ही प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. त्यामुळे या मालिकेतील महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी माझी निवड केल्याबद्दल निर्माते रवी करमकर आणि ‘सन मराठी’ वाहिनीचे मनापासून आभार.”
पुढे तो म्हणाला, “माझी ही भूमिका माझ्यासाठी खरोखरच खूप आव्हानात्मक आहे. यापूर्वी मी पौराणिक, ऐतिहासिक तसेच कौटुंबिक मालिकांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. प्रत्येक भूमिका साकारताना त्या व्यक्तिरेखेचा सखोल अभ्यास आणि तयारी करणं माझ्यासाठी नेहमीच महत्त्वाचं राहिलं आहे.”
व्यक्तिरेखेच्या अनेक बाजू उलगडणार
निरंजनने सांगितलं की, या भूमिकेसाठी त्याला विशेष तयारी करावी लागत आहे. कारण या व्यक्तिरेखेमध्ये अनेक वेगवेगळ्या बाजू आहेत. त्यामुळे या पात्राचा सखोल अभ्यास करून भूमिका साकारण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्याने सांगितलं.
“मला खात्री आहे की, ही भूमिका देखील माझ्या अभिनयाच्या प्रवासात एक वेगळी ओळख निर्माण करणारी ठरेल,” असं निरंजनने म्हटलं आहे.
आता निरंजन कुलकर्णीची ही नवी भूमिका मालिकेच्या कथेत कोणता बदल घडवून आणणार आणि त्याच्या व्यक्तिरेखेमागचं रहस्य काय आहे, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.