
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Veen Doghantali Hi Tutena: ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत सध्या समर आणि स्वानंदीच्या नात्यातील गोडवा पाहायला मिळत आहे. कामाच्या धावपळीत दोघांनाही निवांत वेळ मिळावा म्हणून आजी समर आणि स्वानंदीला अष्टविनायक यात्रेला पाठवते. त्यामुळे दोघेही या यात्रेसाठी खूप आनंदी असतात. मात्र, दुसरीकडे मल्लिका काकूला त्यांचा हा आनंद काही पाहवत नाही. समर-स्वानंदीच्या यात्रेत विघ्न आणण्यासाठी ती नवा डाव आखताना दिसणार आहे.
समर नेहमी स्वतःला कामात झोकून देतो. त्यामुळे तो अचानक अष्टविनायक यात्रेला जाण्यासाठी तयार झाल्याचं मल्लिकाला सहन होत नाही. समर आणि स्वानंदीला एकत्र वेळ मिळणार असल्याने ती अस्वस्थ होते. आता त्यांच्या यात्रेत नेमकं कसं विघ्न आणायचं, याचा विचार मल्लिका करत असते.
त्याचदरम्यान अंशुमन एक मोठी बातमी आपल्या आईपर्यंत पोहोचवतो. अंशुमन आणि सुश्मिताने समरचं क्रेडिट कार्ड स्वानंदीच्या आईला दिलेलं असतं. या क्रेडिट कार्डवर मंदाकिनीने तब्बल १० लाख रुपयांची शॉपिंग केलेली असते. विशेष म्हणजे या खरेदीचं बिलही पेंडिंग असतं.
हे प्रकरण समोर आल्यानंतर आता दादा आपल्याला ओरडणार आणि पुन्हा आपल्यालाच दोषी ठरवलं जाणार, अशी भीती अंशुमनला वाटत असते. मात्र, मल्लिका या परिस्थितीचा फायदा घेत मोठा डाव खेळते.
मल्लिका सुश्मिताला ताबडतोब तिच्या आई-वडिलांना घरी बोलावून घेण्यास सांगते. त्यानंतर स्वानंदीच्या बाबांकडे १० लाख रुपये व्याजासकट परत करण्याची मागणी करते. पैसे परत केले नाहीत, तर या प्रकरणाचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही ती देते.
स्वानंदीला बाबांची काळजी वाटते
मल्लिकाने अचानक एवढ्या मोठ्या रकमेची मागणी केल्याने स्वानंदीचे बाबा हादरतात. १० लाख रुपये कुठून आणायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहतो. ते चिंतेत असतानाच स्वानंदी त्यांना फोन करते.
फोनवर बाबांचा आवाज आणि त्यांची अवस्था पाहून स्वानंदीलाही काहीतरी गडबड असल्याची शंका येते. ती बाबांना विचारते, “बाबा, तुम्हाला बरं वाटतंय का? तुम्ही गोळ्या घेताय का? बाकी सगळं ठीक आहे ना तिकडे?”
मात्र, लेकीच्या या प्रश्नांना तिचे बाबा काहीच उत्तर देऊ शकत नाहीत. त्यामुळे स्वानंदीच्या मनातही अनेक प्रश्न निर्माण होतात. आता मल्लिकाच्या या डावामुळे समर-स्वानंदीच्या अष्टविनायक यात्रेत नेमकं काय घडणार? तसेच स्वानंदीला तिच्या बाबांवरील संकटाची माहिती मिळणार का, हे आगामी भागांत पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.