( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
विश्वजीत दिनकरराव पाटेकर उर्फ नाना पाटेकर म्हणजे चित्रपटसृष्टीतील दिग्गज आणि नावाजलेले कलाकार. नानांनी फक्त मराठीच नाही तर हिंदी, तामिळ आणि कन्नड चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाचा झेंडा रोवला. १९७८ मध्ये गमन या चित्रपटातून त्यांनी आपले पदार्पण केले. पुढे नटसम्राट, प्रहार, आपला माणूस, क्रांतिवीर, तिरंगा, खामोशी अशा चित्रपटांतून त्यांनी भरपूर लोकप्रियता मिळवली. नटसम्राट हा त्यांचा सर्वात गाजलेला चित्रपट. अनेक चित्रपटांतील त्यांच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अशी छाप उमटवली की नाना पाटेकर हे नाव अभिनयाच्या विश्वात अजरामर झाले.
सिनेसृष्टीतील प्रवास
नाना पाटेकर यांनी आपल्या अभियनाची सुरुवात नाटकांपासून केली. अनेक नाटकांमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावल्यानंतर १९७८ मध्ये ते गमन या मराठी चित्रपटात झळकले. या चित्रपटात नानांची भूमिका फार लहान होती. यानंतर चित्रपटांत मिळेल ती भूमिका ते करत ते स्वत:ला घडवत राहिले. नानांनी सुरुवातीला अनेक चित्रपटांत काम केले पण ते चित्रपट फार चर्चेत ठरु शकले नाही. यानंतर १९८४ साली रिलिज झालेल्या ‘आज की आवाज’ या हिंदी चित्रपटात त्यांनी सहनायकाची भूमिका बजावली. हा चित्रपटही फार चालू शकला नाही पण यातील नानांच्या अभियनाचे फार काैतुक करण्यात आले. ‘अंकुश’ हा नानांचा पहिला गाजलेला चित्रपट ज्यातून त्यांना भरपूर प्रसिद्धी मिळाली, यात त्यांनी बेकारीने त्रस्त असलेल्या सरळमार्गी तरुणाची भूमिका साकरली होती. यानंतर त्यांचा हा प्रवास कधीच थांबला नाही आणि एकानंतर एक हिट चित्रपट ते प्रेक्षकांसाठी घेऊन येत राहिले.
२०२६ साली प्रदर्शित झालेला ‘ओ रोमिओ’ हा नानांचा शेवटचा चित्रपट, यात त्यांनी ‘इस्माईल खान’ नावाची भूमिका साकारली आहे. नाटकापासून सुरू झालेला नाना पाटेकरांचा प्रवास अनेक दशकांनंतरही प्रेक्षकांच्या मनात कायम राहिला. भूमिकेची लांबी नव्हे, तर ती आपल्या अभिनयाने किती मोठी करता येते, हे त्यांनी आपल्या कारकिर्दीतून दाखवून दिले.






