(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Malavika Mohanan: चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कलाकारांचे हटके व्हिडिओ आणि नवनवीन कल्पना नेहमीच पाहायला मिळतात. मात्र, यावेळी ‘पॉकेट नोवेल’च्या टीमने प्रमोशनसाठी एक वेगळीच संकल्पना राबवली आहे. चित्रपटातील कलाकारांसोबतच पडद्यामागे मेहनत घेणाऱ्या संपूर्ण टीमला प्रसिद्धीच्या झोतात आणण्याचा खास प्रयत्न करण्यात आला आहे. अभिनेत्री मालविका मोहनन हिने एका खास व्हिडिओच्या माध्यमातून या उपक्रमाची सुरुवात केली असून, सध्या या व्हिडिओची चर्चा रंगली आहे.
‘पॉकेट नोवेल’च्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एक खास बिहाइंड-द-सीन्स व्हिडिओ प्रदर्शित केला आहे. या व्हिडिओमध्ये चित्रपटाच्या पडद्यामागे काम करणाऱ्या संपूर्ण टीमची झलक पाहायला मिळते. मालविका मोहनन आपल्या खास अंदाजात या व्हिडिओची सुरुवात करते. त्यानंतर शूटिंगशी संबंधित कर्मचारी, तंत्रज्ञ आणि युनिटमधील सदस्यांना स्वतःची ओळख करून देण्याची संधी मिळते.
कला दिग्दर्शन, लाइटिंग, साउंड, मेकअप, कारपेंटर्स, सेट असिस्टंट्स, प्रॉडक्शन टीमपासून ते ड्रायव्हिंग युनिटपर्यंत प्रत्येक विभागातील सदस्य या व्हिडिओत दिसतात. चित्रपट मोठ्या पडद्यावर साकारण्यासाठी केवळ कलाकारच नव्हे, तर पडद्यामागील प्रत्येक व्यक्ती किती महत्त्वाची असते, हे या उपक्रमातून अधोरेखित करण्यात आलं आहे.
कलाकारांसोबत पडद्यामागील टीमलाही मिळणार ओळख
सहसा चित्रपटांमध्ये कलाकार आणि तंत्रज्ञांची नावं शेवटी दाखवल्या जाणाऱ्या क्रेडिट्समध्ये पाहायला मिळतात. मात्र, ‘पॉकेट नोवेल’च्या टीमने यापेक्षा वेगळा मार्ग निवडला आहे. चित्रपटासाठी मेहनत घेणाऱ्या प्रत्येक सदस्याला स्वतंत्रपणे ओळख मिळावी, या उद्देशाने हा खास व्हिडिओ तयार करण्यात आला आहे.
या उपक्रमात सहजपणा, आपलेपणा आणि मनोरंजनाचा सुंदर संगम पाहायला मिळतो. मालविका मोहनन व्हिडिओची सुरुवात करून एकामागून एक क्रू मेंबर्सना समोर आणते. त्यामुळे हा व्हिडिओ केवळ प्रमोशनल न राहता संपूर्ण टीमच्या मेहनतीचा उत्सव ठरतो आहे.
‘सुपर डिलक्स’नंतर थियागराजन कुमारराजा यांचं पुनरागमन
२०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सुपर डिलक्स’ या कल्ट क्लासिक चित्रपटानंतर दिग्दर्शक थियागराजन कुमारराजा पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. ‘सुपर डिलक्स’मधील वेगळं कथानक आणि लक्षात राहणाऱ्या व्यक्तिरेखांमुळे या चित्रपटाचं समीक्षकांसह प्रेक्षकांनीही कौतुक केलं होतं. त्यामुळे त्यांच्या आगामी चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.
‘पॉकेट नोवेल’मध्ये विजय सेतुपती, मालविका मोहनन, राज बी. शेट्टी आणि किशोर कुमार जी. यांच्या प्रमुख भूमिका आहेत. विशेष म्हणजे, या चित्रपटाच्या निमित्ताने विजय सेतुपती आणि थियागराजन कुमारराजा ही जोडी पुन्हा एकदा एकत्र आली आहे.
थियागराजन कुमारराजा दिग्दर्शित ‘पॉकेट नोवेल’ हा चित्रपट २४ जानेवारी २०२७ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी अशा पाच भाषांमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
दमदार कलाकारांची फळी, वेगळ्या प्रमोशनल संकल्पना आणि ‘सुपर डिलक्स’नंतर दिग्दर्शकाचं होणारं पुनरागमन यामुळे ‘पॉकेट नोवेल’बद्दलची उत्सुकता वाढली आहे. आता हा चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षांवर कितपत खरा उतरतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.






