फोटो सौजन्य सोशल मीडिया
नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात आलेल्या हिवाळी वादळामुळे गाझामधील सुमारे ७० हजार तंबूंमध्ये पाणी शिरल्याची माहिती समोर आली आहे. अनेक विस्थापन छावण्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांचे कपडे, अन्नधान्य आणि इतर साहित्य भिजले.
काही ठिकाणी आधीच युद्धामुळे कमकुवत झालेल्या इमारतींच्या भिंती कोसळल्या. अनेक कुटुंबांना पुन्हा सुरक्षित निवाऱ्याच्या शोधात बाहेर पडावे लागले. संयुक्त राष्ट्रांच्या मानवतावादी कार्यालयाच्या माहितीनुसार, २६ हजारांहून अधिक कुटुंबांनी त्यांच्या निवाऱ्याचे किंवा वस्तूंचे नुकसान झाल्याची मदत मागितली आहे.
पॅलेस्टिनी एनजीओ नेटवर्कचे मोहम्मद साल्हा यांनी मदत साहित्य गाझामध्ये पोहोचत नसल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, विस्थापित नागरिकांना तातडीने तंबू आणि निवारा साहित्याची गरज आहे; मात्र सीमांवरील निर्बंधांमुळे मदत पोहोचवण्यात अडथळे येत आहेत.
संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार, मानवतावादी संस्था आणि सदस्य देशांनी खरेदी केलेले दीड लाखांहून अधिक तंबू गाझाबाहेर प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. यामध्ये इजिप्तमधील अल-अरिश येथे साठवलेल्या सुमारे १ लाख १७ हजार तंबूंचा समावेश आहे.
Indonesia News : यूट्यूबची १९ हजारांहून अधिक चॅनेल्स हटवली; गुगलला इंडोनेशिया सरकारचा जाब
तंबूंमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी हिवाळा अधिक धोकादायक ठरत आहे. पावसाचे पाणी आणि थंडीमुळे लहान मुलांना श्वसनाचे आजार, त्वचेचे विकार आणि हायपोथर्मियाचा धोका वाढत आहे. आरोग्य सुविधांवरही पावसाचा परिणाम झाला असून काही ठिकाणी वैद्यकीय सेवा विस्कळीत झाल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय स्थलांतर संघटनेनेही पुरेसा निवारा आणि मदत साहित्य उपलब्ध न झाल्यास हिवाळ्यात आणखी मृत्यू होण्याची भीती व्यक्त केली आहे. दुसरीकडे, इस्रायलच्या मदत साहित्य प्रवेशावरील निर्बंधांवर मानवतावादी संघटनांनी टीका केली आहे. इस्रायलकडून मात्र मदत आणि आवश्यक वस्तूंचा पुरवठा सुरू असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे गाझातील नागरिकांना सुरक्षित निवारा मिळण्यासाठी सीमांवरील मदतपुरवठा वाढवण्याची मागणी जोर धरत आहे.






