
१.५ कोटींची लक्झरी कार सोडून नाना पाटेकरांनी शेतकरी कुटुंबाला मदत
बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर हे त्यांच्या दमदार अभिनयासोबतच सामाजिक जाणिवांसाठीही ओळखले जातात. शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी त्यांनी केलेल्या मदतीचे अनेक किस्से यापूर्वीही समोर आले आहेत. आता लेखक रणबीर पुष्प यांनी नाना पाटेकर यांच्या आयुष्यातील असाच एक किस्सा सांगितला आहे. विशेष म्हणजे, शेतकरी कुटुंबांची परिस्थिती पाहून नाना पाटेकरांनी तब्बल १.५ कोटी रुपयांची लक्झरी कार घेण्याचा निर्णय बदलल्याचे त्यांनी सांगितले.
रणबीर पुष्प यांनी सिद्धार्थ कन्नन यांच्या पॉडकास्टमध्ये नाना पाटेकर यांच्याशी संबंधित हा किस्सा सांगितला. त्यांच्या म्हणण्यानुसार, नाना एकदा टीव्हीवर शेतकरी आत्महत्येमुळे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांची परिस्थिती पाहत होते. या बातम्यांचा त्यांच्यावर मोठा परिणाम झाला. त्याच काळात नाना पाटेकर सुमारे १.५ कोटी रुपये किंमतीची कार घेण्याच्या तयारीत होते. मात्र, शेतकरी कुटुंबांची व्यथा पाहिल्यानंतर त्यांनी कार न घेण्याचा निर्णय घेतला. त्याऐवजी या पैशांचा उपयोग गरजू शेतकरी कुटुंबांना मदत करण्यासाठी करण्याचे त्यांनी ठरवले, असे रणबीर पुष्प यांनी सांगितले.
रणबीर पुष्प यांच्या आठवणीनुसार, नाना पाटेकरांनी आपल्या एका कलाकार मित्राला बोलावून शेतकरी कुटुंबांसाठी प्रत्येकी १५ हजार रुपयांचे चेक तयार करण्यास सांगितले. या मदतीमागे कोणताही प्रसिद्धीचा हेतू नसून गरजू कुटुंबांना आधार देण्याची भावना होती, असा संदर्भ या किस्स्यातून समोर येतो.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी नाना पाटेकर यांचे असलेले नाते यानंतर आणखी व्यापक झाले. नाना पाटेकर आणि अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी २०१५ मध्ये ‘नाम फाउंडेशन’ची स्थापना केली. संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकरी आणि दुष्काळग्रस्त कुटुंबांसाठी मदतकार्य करण्यात आले. यापूर्वीही नाना पाटेकर यांनी विदर्भातील ६२ आणि मराठवाड्यातील ११३ शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी १५ हजार रुपयांचे चेक दिल्याची नोंद आहे.
नाना पाटेकर यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल अनेकदा त्यांच्या स्पष्टवक्तेपणा आणि रागीट स्वभावाची चर्चा होते. मात्र, रणबीर पुष्प यांनी सांगितलेल्या या किस्स्यातून त्यांच्या सामाजिक संवेदनशीलतेचा वेगळा पैलू समोर येतो. महागडी कार घेण्याऐवजी गरजू शेतकरी कुटुंबांना मदत करण्याचा निर्णय घेतल्याचा हा प्रसंग सध्या पुन्हा चर्चेत आला आहे.
नाना पाटेकर यांचे शेतकऱ्यांसाठीचे काम केवळ एका घटनेपुरते मर्यादित राहिले नाही. ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातूनही शेतकरी आणि ग्रामीण भागातील कुटुंबांसाठी मदतकार्य सुरू राहिले आहे. त्यामुळे त्यांच्या या निर्णयाची चर्चा आजही केली जाते.
नाना पाटेकर यांचा शेतकरी कुटुंबाला मदतीचा किस्सा सांगताना आजून एक किस्सा देखील त्यांनी सांगितला, एकदा त्यांनी कोणालातरी गाडीतून प्लास्टिकची बाटली बाहेर फेकताना पाहिले होते. त्यांनी आपली गाडी थांबवून ती बाटली उचलली होती. मग नाना पाटेकरांनी गाडी थांबवली, त्याला खिडकी खाली घ्यायला सांगितली आणि म्हणाले, “भारताला स्वच्छ कोण ठेवणार? गांधीजी गेले, पण तुम्ही अजूनही या पृथ्वीवर आहात. तर, एक नागरिक म्हणून देश स्वच्छ ठेवणे ही तुमची जबाबदारी नाही का? मी तुमच्या गाडीवर बाटल्या फेकू का?”