
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
बॉलिवूडचा ‘खलनायक’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता संजय दत्त आज (२९ जुलै) आपला ६७ वा वाढदिवस साजरा करत आहे. रुपेरी पडद्यावर अनेक दमदार भूमिका साकारणाऱ्या संजय दत्तच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र संघर्ष, दुःख, वाद आणि अनेक कठीण प्रसंग आले. आईचे निधन, अमली पदार्थांचे व्यसन, अपयशी प्रेम, पत्नींचा विरह, तुरुंगवास आणि कॅन्सरसारख्या आजाराशी लढा देत त्याने प्रत्येक संकटावर मात केली.
‘संजय’ हे नाव कसे पडले?
२९ जुलै १९५९ रोजी अभिनेते सुनील दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांच्या घरी संजय बलराज दत्तचा जन्म झाला. मुलाच्या नावासाठी दत्त दाम्पत्याने ‘शमा’ मासिकातून सूचना मागवल्या होत्या. देशभरातून आलेल्या हजारो नावांमधून अखेर ‘संजय’ हे नाव निवडण्यात आले.
बालपणापासूनच खोडकर स्वभाव
लहानपणी संजय खूप खोडकर होता. एकदा खेळताना त्याच्या हातात वडिलांची परवानाधारक बंदूक लागली आणि चुकून घरकाम करणाऱ्या महिलेवर गोळी झाडली. ती गंभीर जखमी झाली होती. तसेच घरातील पार्ट्यांमध्ये सेलिब्रिटींना सिगारेट ओढताना पाहून त्यानेही लहान वयात धूम्रपान सुरू केले.
इंदिरा गांधींच्या सल्ल्यानंतर बोर्डिंग स्कूलमध्ये प्रवेश
संजयच्या वाढत्या खोड्यांमुळे सुनील दत्त चिंतेत होते. त्यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या सल्ल्यानुसार संजयला हिमाचल प्रदेशातील लॉरेन्स स्कूल, सनावर येथे बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवण्यात आले. मात्र, तिथेही त्याच्या खोड्या सुरूच राहिल्या.
‘रॉकी’पूर्वीच आईचे निधन
१९८१ मध्ये ‘रॉकी’ चित्रपटातून संजय दत्त बॉलिवूडमध्ये नायक म्हणून पदार्पण करणार होता. मात्र, चित्रपट प्रदर्शित होण्याच्या अवघ्या तीन दिवस आधी त्याची आई नर्गिस यांचे निधन झाले. आपल्या मुलाचा पहिला चित्रपट पाहण्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली. या धक्क्याने संजय पुन्हा अमली पदार्थांच्या विळख्यात अडकला.
व्यसनातून बाहेर पडण्याचा निर्धार
दारू आणि ड्रग्जच्या व्यसनामुळे संजयची प्रकृती गंभीर झाली होती. एका मुलाखतीत त्याने दोन दिवस बेशुद्ध अवस्थेत राहिल्याचा प्रसंग सांगितला होता. अखेर त्याने स्वतः वडील सुनील दत्त यांच्याकडे मदत मागितली. त्यानंतर त्याला अमेरिकेतील पुनर्वसन केंद्रात पाठवण्यात आले आणि तिथून त्याच्या नव्या आयुष्याची सुरुवात झाली.
प्रेम, विवाह आणि वैयक्तिक आयुष्यातील चढ-उतार
‘रॉकी’च्या चित्रीकरणादरम्यान संजय अभिनेत्री टीना मुनीमच्या प्रेमात पडला. मात्र, व्यसनामुळे हे नाते टिकले नाही.
यानंतर १९८७ मध्ये त्याने अभिनेत्री रिचा शर्माशी विवाह केला. त्यांना त्रिशला दत्त ही मुलगी झाली. मात्र, रिचाला ब्रेन ट्यूमरचे निदान झाले आणि १९९६ मध्ये तिचे निधन झाले.
१९९८ मध्ये संजयने रिया पिल्लईशी दुसरे लग्न केले. काही वर्षांतच दोघे वेगळे झाले आणि २००८ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.
याच वर्षी संजयने मान्यता दत्तसोबत तिसरे लग्न केले. सध्या हे दोघे सुखी वैवाहिक आयुष्य जगत असून त्यांना शहरान आणि इकरा ही जुळी मुले आहेत.
वाद, तुरुंगवास आणि दमदार पुनरागमन
१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात नाव आल्याने संजय दत्तला अनेक वर्षे न्यायालयीन लढा द्यावा लागला. तुरुंगवासानंतरही त्याने हार मानली नाही. ‘मुन्नाभाई एमबीबीएस’, ‘लगे रहो मुन्नाभाई’, ‘वास्तव’, ‘कांटे’, ‘अग्निपथ’, ‘केजीएफ २’ यांसारख्या चित्रपटांतून त्याने दमदार पुनरागमन केले.
आज ६७व्या वर्षीही संजय दत्त आपल्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहे. पडद्यावर ‘खलनायक’ची भूमिका साकारणारा हा अभिनेता वास्तव आयुष्यात मात्र प्रत्येक संकटाशी दोन हात करणारा खरा योद्धा ठरला आहे.