(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Ramayana Trailer Release Date:दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या बहुप्रतीक्षित ‘रामायण पार्ट १’ या चित्रपटाची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. रणबीर कपूर (Ranbir Kapoor), साई पल्लवी (Sai Pallavi) आणि यश (Yash)यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर ही प्रतीक्षा संपली असून निर्माते नमित मल्होत्रा यांनी ट्रेलरच्या प्रदर्शनाची अधिकृत तारीख आणि वेळ जाहीर केली आहे.
मूळ नियोजनानुसार ‘रामायण’ चा ट्रेलर २४ जुलै २०२६ रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र, काही विशेष स्क्रीनिंग आणि इतर कार्यक्रमांमुळे त्याचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले होते. आता निर्माते नमित मल्होत्रा यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ट्रेलर ३० जुलै २०२६ रोजी प्रदर्शित होणार असल्याची घोषणा केली आहे.
नमित मल्होत्रा यांनी शेअर केलेल्या पोस्टरवर, “शुभ ब्रह्ममुहूर्तावर, गुरुवार, ३० जुलै २०२६ रोजी पहाटे ४:१५ वाजता ‘रामायण’च्या ट्रेलरसह जगभरात नव्या सकाळचे स्वागत करू,” असा संदेश देण्यात आला आहे. या घोषणेनंतर सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोस्टवर चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका चाहत्याने, “माझं मन तोडू नका, संपूर्ण जग थक्क होईल असं काहीतरी दाखवा… जय बजरंगबली,” अशी प्रतिक्रिया दिली. तर दुसऱ्या एका युजरने, “पहाटे ४:१५ वाजता उठावं लागणार,” असे लिहिले. आणखी एका चाहत्याने, “आता पुन्हा निराश करू नका, या ट्रेलरची खूप दिवसांपासून वाट पाहतोय,” अशी भावना व्यक्त केली.
दरम्यान, ट्रेलरचे प्रदर्शन पुढे ढकलल्यामुळे काही दिवसांपूर्वी चाहते नाराज झाले होते. सोशल मीडियावर त्यांनी निर्मात्यांवर टीकाही केली होती. मात्र, आता अधिकृत रिलीज डेट जाहीर झाल्यानंतर चाहत्यांचा उत्साह पुन्हा वाढला आहे.
याचदरम्यान, ‘रामायण पार्ट १’ च्या ट्रेलरमधील काही क्लिप्स सोशल मीडियावर लीक झाल्याची चर्चा रंगली आहे. त्या क्लिप्सवर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या असल्या, तरी अधिकृत ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ हा चित्रपट दोन भागांत प्रदर्शित होणार आहे. पहिला भाग यंदाच्या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, दुसरा भाग २०२७ च्या दिवाळीत प्रदर्शित होणार आहे. रणबीर कपूर प्रभू श्रीराम, साई पल्लवी माता सीता आणि यश रावणाच्या भूमिकेत दिसणार असल्याने या चित्रपटाविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.






