(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)
OTT Releases This Week: ओटीटीप्रेमींसाठी नोव्हेंबरचा दुसरा आठवडा मनोरंजनाची खास मेजवानी घेऊन येणार आहे. ९ ते १५ नोव्हेंबरदरम्यान नेटफ्लिक्स, प्राईम व्हिडिओ आणि जिओहॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाच नवे चित्रपट आणि वेब सीरिज प्रदर्शित होणार आहेत. यामध्ये सस्पेन्स, क्राईम, कॉमेडी, अॅक्शन आणि थ्रिलर अशा विविध जॉनरचा आनंद प्रेक्षकांना घेता येणार आहे. विशेष म्हणजे, काही चित्रपट आणि मालिकांमध्ये अनपेक्षित वळणं आणि रोमांचक घटना पाहायला मिळणार आहेत.
१. रणबली (Ranabaali)
विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘रणबली’ हा चित्रपट लवकरच ओटीटीवर दाखल होणार आहे. चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर आता हा चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. १३ नोव्हेंबरपासून नेटफ्लिक्सवर हा चित्रपट पाहता येणार आहे. विशेष म्हणजे, तेलुगू, तमिळ, हिंदी, कन्नड आणि मल्याळम अशा पाच भाषांमध्ये तो उपलब्ध होणार आहे.
२. द लॉर्ड ऑफ द रिंग्स: द रिंग्स ऑफ पॉवर सीझन ३ (The Lord of the Rings: The Rings of Power Season 3)
‘द लॉर्ड ऑफ द रिंग्स: द रिंग्स ऑफ पॉवर’ या लोकप्रिय मालिकेच्या तिसऱ्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर या नव्या सीझनच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे. ११ नोव्हेंबरपासून ही मालिका प्राईम व्हिडिओवर पाहता येणार आहे. सुरुवातीला मालिकेचे चार भाग एकाच वेळी प्रदर्शित केले जातील. त्यानंतर उर्वरित भाग १८ आणि २५ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतील.
३. एलान (Eleven)
अॅक्शन, सायन्स फिक्शन आणि कॉमेडीचा मिलाफ असलेला ‘एलान’ हा चित्रपटही या आठवड्यात ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. ११ नोव्हेंबरपासून नेटफ्लिक्सवर हा चित्रपट पाहता येईल. अॅक्शनसोबतच थरार आणि सस्पेन्सने भरलेली दृश्यं पाहण्याची इच्छा असलेल्या प्रेक्षकांसाठी हा चित्रपट एक चांगला पर्याय ठरू शकतो. कुटुंबासोबत मनोरंजनाचा आनंद घेण्यासाठीही हा चित्रपट पाहता येईल.
४. स्टुडंट ऑफ द इयर: आफ्टर डार्क (Student of the Year: After Dark)
शनाया कपूरची आगामी मालिका ‘स्टुडंट ऑफ द इयर: आफ्टर डार्क’ देखील या आठवड्यात ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. १३ नोव्हेंबरपासून ही मालिका जिओहॉटस्टारवर पाहता येईल. या मालिकेत शनाया कपूरसोबत दिविक शर्मा, मान्या ग्रोव्हर, शीबा चड्ढा आणि विवेक गोम्बर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. करण जोहरने या मालिकेची निर्मिती केली असून रीमा माया यांनी दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
‘द चोझन’ या लोकप्रिय मालिकेच्या सहाव्या सीझनचाही या आठवड्यातील ओटीटी रिलीजच्या यादीत समावेश आहे. या मालिकेचे पहिले तीन भाग १५ नोव्हेंबर रोजी प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहेत. त्यानंतर ६ डिसेंबरपर्यंत दर आठवड्याच्या शेवटी मालिकेचा एक नवीन भाग प्रदर्शित केला जाणार आहे. त्यामुळे या मालिकेच्या नव्या सीझनची प्रतीक्षा करणाऱ्या चाहत्यांना लवकरच तो पाहता येणार आहे.
एकूणच, ९ ते १५ नोव्हेंबरदरम्यान ओटीटीवर वेगवेगळ्या जॉनरचे पाच चित्रपट आणि सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यामुळे या आठवड्यात घरबसल्या मनोरंजनाचा आनंद घेण्यासाठी प्रेक्षकांकडे अनेक पर्याय उपलब्ध असतील.






