(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)
Sania Mirza Dating : भारताची माजी टेनिसपटू सानिया मिर्झा गेल्या काही काळापासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकसोबत घटस्फोट झाल्यानंतर सानिया आपल्या मुलाचा एकटीने सांभाळ करत आहे. दुसरीकडे, शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत लग्न केलं. त्यामुळे सानिया पुन्हा लग्न करणार का, तिच्या आयुष्यात नव्या व्यक्तीची एंट्री होणार का, असे प्रश्न चाहत्यांकडून उपस्थित केले जात आहेत. अशातच सानियाने एका टॉक शोमध्ये आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल स्पष्टपणे भाष्य केलं आहे.
नुकतीच सानिया मिर्झाने ‘डबल डेट’ या टॉक शोमध्ये पाहुणी म्हणून हजेरी लावली होती. यावेळी तिच्यासोबत दिग्दर्शिका फराह खानदेखील उपस्थित होती. शोदरम्यान सानियाला तिच्या डेटिंग लाइफबद्दल काही प्रश्न विचारण्यात आले.
अंगदने सानियाला विचारलं की, “तुला कधी कोणत्या मित्राने कॉफी डेटसाठी विचारलं नाही का?” यावर सानिया म्हणाली, “ते मला मुलांच्या ट्रिपसाठी बोलावतात आणि मला एका मुलाप्रमाणेच वागवतात.”
यानंतर फराह खानने सांगितलं की, तिचे मित्र तिला फोन करून सानिया खरंच सिंगल आहे का, असं विचारतात. त्यावर सानियाने स्पष्ट उत्तर दिलं, “मी खरंच सिंगल आहे.”
संवादादरम्यान अंगदने सानियाला आणखी एक प्रश्न विचारला. “तुला कधी असं वाटत नाही का की एखाद्या पुरुषासोबत चांगले क्षण घालवावेत?” असा प्रश्न त्याने केला. यावर फराह खानने लगेचच उत्तर देत म्हटलं, “तुला काय माहीत की ती आयुष्याचा आनंद घेत आहे की नाही?”
फराहच्या या उत्तराला दुजोरा देत सानिया म्हणाली, “माझ्या आयुष्यात कोणताच पुरुष नाही आणि माहिती नाही, पुढे असू शकतो की नाही.”
सानियाच्या या वक्तव्यामुळे तिच्या दुसऱ्या लग्नाबाबत सुरू असलेल्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे. मात्र, सध्या तरी ती सिंगल असल्याचं आणि भविष्यातील नात्यांबाबत कोणताही निर्णय जाहीर केलेला नसल्याचं तिच्या वक्तव्यावरून स्पष्ट होतं.






