
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Prabhas Fauzi: भारताचा सुपरस्टार प्रभास याच्या वाढदिवसानिमित्त आगामी ऐतिहासिक अॅक्शन ड्रामा ‘फौजी’च्या टीमने चित्रपटाचं नवं पोस्टर रिलीज केलं आहे. या पोस्टरमध्ये प्रभासचा हटके व्हिंटेज लूक पाहायला मिळत असून, त्याच्या दमदार अंदाजाने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पोस्टरमुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.
प्रभासने आपल्या अभिनयाच्या जोरावर देशासह जगभरात मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. त्याचे भव्य चित्रपट, दमदार स्क्रीन प्रेझेन्स आणि बॉक्स ऑफिसवरील यश यामुळे त्याच्या प्रत्येक आगामी चित्रपटाकडे चाहत्यांचं लक्ष लागलेलं असतं. आता प्रभास ‘फौजी’ या ऐतिहासिक अॅक्शन ड्रामामधून एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
प्रभासच्या वाढदिवसाचं औचित्य साधत निर्मात्यांनी चित्रपटाचं अधिकृत पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये एका सोनेरी नाण्यावर गणवेशातील प्रभासची बाजूने दिसणारी प्रतिमा आहे. नाण्याभोवती दिसणाऱ्या आगीच्या ज्वाळांमुळे पोस्टरला अधिक भव्य आणि प्रभावी रूप मिळालं आहे.
‘फाईल नंबर 025’ आणि ‘एक अशी बटालियन, जी एकटीच लढते’ चर्चेत
पोस्टरवरील ‘फाईल नंबर 025 वरून आज पडदा उठणार’ ही ओळ चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. त्यासोबतच ‘एक अशी बटालियन, जी एकटीच लढते’ ही दमदार टॅगलाइनही चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवत आहे. प्रभासचा व्हिंटेज लूक आणि पोस्टरवरील या खास ओळींमुळे सोशल मीडियावर चित्रपटाची चर्चा रंगली आहे.
प्रभासच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या या घोषणेला चाहते आणि चित्रपटप्रेमींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटातील त्याची भूमिका नेमकी कशी असेल, याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
Bigg Boss 20: ‘आमच्यामध्ये कधीच..’, बिग बॉस २० मध्ये ढसाढसा रडली माही विज; जय भानुशालीही झाला भावुक
‘फौजी’चं दिग्दर्शन हनु राघवपुडी यांनी केलं आहे. मैत्री मूव्ही मेकर्सच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून, टी-सीरीज फिल्म्स प्रस्तुत करत आहे. नवीन येरनेनी, वाय. रविशंकर आणि भूषण कुमार हे चित्रपटाचे निर्माते आहेत.
‘फौजी’ हा चित्रपट ३ डिसेंबर २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. प्रभासचा वेगळा लूक, ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि अॅक्शनने भरलेली कथा यामुळे हा चित्रपट त्याच्या चाहत्यांसाठी उत्सुकतेचा विषय ठरत आहे.